दिंदोडा प्रकल्पासाठी अवैध उत्खनन

By Admin | Updated: May 9, 2015 01:04 IST2015-05-09T01:04:34+5:302015-05-09T01:04:34+5:30

तालुक्यातील दिंदोडा गावाच्या शिवारातील वर्धा नदीमध्ये दिंदोडा बॅरेज प्रकल्पाचे काम सुरू आहे.

Illegal excavation for Dindoda project | दिंदोडा प्रकल्पासाठी अवैध उत्खनन

दिंदोडा प्रकल्पासाठी अवैध उत्खनन

वरोरा : तालुक्यातील दिंदोडा गावाच्या शिवारातील वर्धा नदीमध्ये दिंदोडा बॅरेज प्रकल्पाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाकरीता वर्धा नदीतून गौण खणीज मोठ्या प्रमाणात अवैधरित्या उत्खनन करण्यात येत आहे. याची माहिती मिळताच शुक्रवारी महसुल विभागाने कारवाई करून दोन हायवा ट्रक जप्त केले.
दिंदोडा बॅरेज प्रकल्प वर्धा नदीच्या संगमावर वरोरा तालुक्यातील दिंदोडा गावाच्या शिवारात होणार आहे. या प्रकल्पाकरीता काही वर्षांपूर्वी चंद्रपूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यातील जमिनी अत्यल्प मोबदला देवून अधिग्रहीत केल्या होत्या. प्रकल्पात जमिनी अत्यल्प किमतीने अधिग्रहीत केल्याने काही शेतकऱ्यांनी वाढीव मोबदल्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिल्यानंतरही शासनाने वाढीव मोबदला दिला नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूरच्या कार्यालयातील साहित्य जप्त करण्यात आले होते.
त्यानंतर प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली प्रशासनाने करीत काही दिवसापूर्वी जाहीर सुनावणी घेण्यात आली. त्यात प्रकल्पग्रस्तांनी वाढीव मोबदला दिल्याशिवाय प्रकल्पाचे काम सुरू करू नका तसेच प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्या, आदी आग्रही मागण्या केल्या. या मागण्या शासन दरबारी पोहचवून यानंतर शासन काय निर्णय घेते, त्यानंतर बघू अशी भूमिका जनसुनावणीच्या वेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी घेतली.
जनसुनावणी बाबत प्रकल्पग्रस्तांना काही कळविण्याच्या आतच दिंदोडा गावानजीक प्रकल्पाचे काम सुरू करण्याकरिता साहित्य काही दिवसापूर्वी आणण्यात आले. त्यानंतर प्रकल्पाचे काम करण्याकरिता खोदकाम सुरू करण्यात आले. रेतीचा उपसा करून ढिग तसेच मुरुम व मातीचे ढिगारे नदीतून काढून जमा करण्यात आले. याबाबतची माहिती वरोरा महसुल विभागास मिळताच त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली व त्या कामावरील एमएच २५ यु १६९ व एमएच २५ बी ९९८० या क्रमांकाचे दोन हायवा ट्रक महसुल विभागाने जप्त केले. जप्त ट्रक तहसील कार्यालय वरोरा येथे ठेवण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत प्रकल्पाचे काम बंद करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Illegal excavation for Dindoda project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.