अवैध वीट भट्ट्यांना अभय

By Admin | Updated: February 1, 2017 00:35 IST2017-02-01T00:35:37+5:302017-02-01T00:35:37+5:30

पोंभुर्णा तालुक्यात अनेक विटभट्ट्या विनापरवाना सुरु आहेत.

Illegal brick kilns | अवैध वीट भट्ट्यांना अभय

अवैध वीट भट्ट्यांना अभय

शासन नियमांची पायमल्ली : लाखोंचा बुडतोय महसूल
पोंभुर्णा : पोंभुर्णा तालुक्यात अनेक विटभट्ट्या विनापरवाना सुरु आहेत. या विटभट्ट्यांमुळे स्थानिक परिसरामध्ये पर्यावरणाला धोका निर्माण झाला असून यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडत आहे. याकडे लक्ष द्यायला अधिकाऱ्यांना वेळ मिळत नसल्याची खमंग चर्चा तालुका परिसरामध्ये सुरु आहे.
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी विटभट्टी लावणाऱ्यांना दरवर्षी संबंधीत ग्रामपंचायती सोबतच वनविभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घेऊनच विटभट्टी लावण्याची परवानगी दिली जाते. यासाठी शासकीय अनुदान शुल्क भरुन उपविभागीय अधिकाऱ्याकडून परवानगी दिली जाते. विटासाठी कोणते साहित्य लागते आणि ते वापरण्याचे काही नियम आहेत. हे नियम लक्षात घेऊन उत्खननातून माती काढावी लागते. महसूल विभागाने भरुन घेतलेल्या रॉयल्टीच्या निकषाप्रमाणेच उत्पादन काढणे आवश्यक असते. परंतु विटाचे वाढीव उत्पादन करुन शासनाचा महसूल बुडविण्याचे काम विटा निर्मिती करणाऱ्याकडून सुरु आहे. विटा व्यवसायिक या सर्व नियमांचे पालन करीत आहेत की नाही, याबाबत तपासणी करण्याची जबाबदारी महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची असते. मात्र याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे.
तालुक्यातील विटाभट्ट्यातून परवान्यापेक्षाही अधिक उत्पादन सुरु आहे. जाम तुकूम येथील परिसरामध्ये तर एकाच ठिकाणी पाच विटाभट्टी लावण्यात आल्या आहेत. अनेकांनी गावालगतच आपले व्यवसाय सुरु केले आहे. यातील काही व्यक्तींना परवाना असून काही व्यक्ती विनापरवाना व्यवसाय करीत आहेत. देवाडा खुर्द, हत्तीबोडी, झुल्लूरवार तुकूम याठिकाणी विटा व्यवसायिकांनी आपला व्यवसाय सुरु केला आहे. काही ठिकाणी तर एकत्र व्यवसाय करुन दोन लाख विटाभट्टीची रॉयल्टी काढून त्यावर पाच ते सात लाख विटांचे उत्पादन घेऊन शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविल्या जाते. पोंभुर्णा तालुक्यामध्ये दरवर्षी जवळपास १० ते १२ च्या आसपास विटाभट्टीधारक व्यवसाय करीत असतात. प्रत्येक भट्टीवर दोन लाखापेक्षा अधिक विटांची निर्मिती केली जाते. नवीन विटांची विक्री करताना विटा विक्रेत्यांकडून जागेवर हजार रुपये प्रति हजार तर नियोजित ठिकाणी पोहोचवून देताना चार ते साडेचार हजार रुपये प्रति हजार विटांना भाव आकारला जातो. त्यामुळे विटा विक्रीची उलाढाल तालुक्यामध्ये कोटींच्या घरात होत असते. त्यांना अभय कुणाचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या व्यवसायिकांवर काय कारवाई केली जाणार आहे, याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)

अधिकाऱ्यांची चुप्पी
यासंदर्भात तलाठी, ग्रामसेवक, महसूल अधिकारी यांना माहिती असतानासुद्धा सर्रास विनापरवाना विटभट्ट्या सुरु आहेत. याबाबत त्यांनी चुप्पी साधली आहे.

Web Title: Illegal brick kilns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.