ग्रामीण जलशुद्धीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

By Admin | Updated: March 26, 2015 00:52 IST2015-03-26T00:52:52+5:302015-03-26T00:52:52+5:30

शासन नागरिकांच्या आरोग्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे हा उद्देश आहे.

Ignoring the administration of rural water purification | ग्रामीण जलशुद्धीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

ग्रामीण जलशुद्धीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

चंद्रपूर : शासन नागरिकांच्या आरोग्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च करते. या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे हा उद्देश आहे. स्वच्छ व शुद्ध पाणी प्रत्येक व्यक्तीला मिळणे आवश्यक आहे. परंतु जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जलशुद्धीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. उन्हाळ्यात जलस्रोतांनी तळ गाठला असून तळाचे दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे जलजन्य आजार बळावण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नळ योजना असून अनेक गावात विहिरींवरून तसेच हातपंपावरून पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात. बहुतांश ठिकाणी पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात आली नाही. त्यामुळे दूषित पाणी प्यावे लागत आहे. ग्रामपंचायत ही गावची प्रमुख संस्था असते. ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा करण्याची कामेही केली जातात. ग्रामपंचायतीचा कारभार मुख्यत: सरपंच आणि ग्रामसेवक सांभाळत असतो. मात्र ग्रामसेवकाला विविध कामे असल्याने त्याला नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देणे शक्य होत नाही. परंतु जलशुद्धीकरणाची जबाबदारी ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी तथा पाणी पुरवठा समितीवर असते. गावाला दूषित पाणीपुरवठा होणार नाही याची खबरदारी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना घेणे आवश्यक आहे. परंतु जिल्ह्यातील काही गावांमध्ये जलशुद्धीकरण यंत्रणाच नाही. नळाद्वारे येणारे पाणी थेट नळ योजनेच्या विहिरीतून येते. कधीकधी ब्लिचिंग पावडर टाकले जाते. सध्या उन्हाळा सुरू आहे. त्यामुळे पाण्याने तळ गाठला आहे. अशा स्थितीत पाण्यासोबत तळाला साचलेला गाळही नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचतो. या सर्व प्रकारामुळे जलजन्य आजार पसरण्याची भीती आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Ignoring the administration of rural water purification

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.