दूषित पाणी पुरवठ्याकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: January 24, 2015 00:44 IST2015-01-24T00:44:21+5:302015-01-24T00:44:21+5:30
भद्रावती तालुक्यातील पळसगाव (मजरा) हे गाव अनेक समस्यांनी बेजार आहे. राजकीय अनास्था आणि प्रशासनातील लोकसेवकांची चालढकल यामुळे गावकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

दूषित पाणी पुरवठ्याकडे दुर्लक्ष
माजरी : भद्रावती तालुक्यातील पळसगाव (मजरा) हे गाव अनेक समस्यांनी बेजार आहे. राजकीय अनास्था आणि प्रशासनातील लोकसेवकांची चालढकल यामुळे गावकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गावात दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना प्रशासन मात्र थातूरमातूर कामे करून नागरिकांचे समाधान करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून १५ दिवसांत दूषित पाण्याची समस्या सुटली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
भद्रावती तालुक्यातील पळसगाव (माजरी) येथील पाणी पुरवठा करणाऱ्या गावातील नळयोजनेच्या व्हॉल लगत घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मात्र ती घाण स्वच्छ करण्याचे सौजन्य अद्यापही दाखविण्यात आले नसल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या व्हाल्व भोवती मोठ्या प्रमाणावर खतांचे ढिगारे आहेत. त्यामुळे पिण्याचे पाणी दूषित होत आहे. योग्य ठिकाणी व्हॉल असताना ग्रामसभा किंवा ग्रामपंचायतीचा ठराव न घेता व्हॉल्वची जागा बदलविण्यात आली, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.
या पाईप लाईनचे व्हॉल्व योग्य ठिकाणी बसवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. व्हाल्व लगत व वॉलच्या टाक्यातील घाण स्वच्छ करण्यात यावी, अशी विनंती जीवन रोडे, ग्रा.प. सदस्य अनिता रोडे, मनोरमा बंडू बंड, दीपक डाहुले, अनिल बंड, संदीप आंबेकर, सुखेदव पा. बंड, मंगला मन्ने यांसह इतर ४१ ग्रामस्थांच्या स्वाक्षरीचे निवेदन देण्यात आले. निवेदनाच्या प्रतिलिपी ग्रामपंचायत सरपंच व सचिव, सभापती पंचायत समिती भद्रावती, सभापती आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर यांना देण्यात आल्यात. (वार्ताहर)
गावात अनेक समस्या
पळसगाव (माजरी) या गावात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा निवेदने दिलीत, मात्र त्या निवेदनांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. यामुळे गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गावकरी आंदोनाच्या पवित्र्यात
अनेकदा निवेदने देऊनही समस्या सुटल्या जात नसल्याने गावकरी वैतागले आहेत. दरवर्षी या गावाला घाणीच्या साम्राज्यामुळे विविध आजारांचा सामना करावा लागतो. मात्र गावातील घाण स्वच्छ करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही. सध्या गावकरी दूषित पाण्याचा पिण्यासाठी वापर करीत आहेत. येत्या १५ दिवसांत दूषित पाण्याची समस्या न सुटल्यास गावकरी आंदोलन करणार आहेत.