अवैध शिकवण्यांकडे शिक्षणाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
By Admin | Updated: January 24, 2015 22:51 IST2015-01-24T22:51:09+5:302015-01-24T22:51:09+5:30
अवैध शिकवणी वर्गांविरूद्ध शिक्षणाधिकाऱ्यांनी मधल्या काळात मोहीम उघडली असली तरी अलिकडे ती थंडावली. एवढेच नाही तर, नेहरू कनिष्ठ विद्यालयातील शिक्षकांना शिकवणी वर्ग घेताना

अवैध शिकवण्यांकडे शिक्षणाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
चंद्रपूर : अवैध शिकवणी वर्गांविरूद्ध शिक्षणाधिकाऱ्यांनी मधल्या काळात मोहीम उघडली असली तरी अलिकडे ती थंडावली. एवढेच नाही तर, नेहरू कनिष्ठ विद्यालयातील शिक्षकांना शिकवणी वर्ग घेताना रंगेहात पकडूनही कारवाई झालीच नाही. परिणामत: अवैध शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षक-प्राध्यापकांचे मनोधैर्य वाढले असून त्याचा फटका मात्र सर्वसामान्य गरिब विद्यार्थ्यांना बसत आहे.
शाळा-महाविद्यालय अथवा शैक्षणिक संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या शिक्षक-प्राध्यापकांना खाजगी शिकवणी वर्ग घेता येत नाहीत. असे असतानाही संस्थाचालक आणि शिक्षकांच्या मधूर सबंधातून चंद्रपूर शहरात अवैध शिकवणी वर्गांचे पीक आले आहे.
अलिकडेच शिक्षणाधिकाऱ्यांना प्राप्त झालेल्या एका निनावी तक्रारीत चंद्रपुरातील भवानजीभाई चव्हाण हायस्कूलमधील शिक्षक-प्राध्यापकांच्या अवैध शिकवणी वर्गांचा हिशेब मांडण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या अवैध वर्गाला व्यवस्थापनाचेही पाठबळ असून शिकवणीच्या शुल्कातील ठराविक हिस्सा व्यवस्थापनालाही मिळतो, अशी तक्रार आहे. विज्ञान विषयाचे दोन वर्ग असून १४० विद्यार्थी शिक्षण घेतात. सी.बी. टोंगे, के.एन. विधाते, प्रा.धानोरकर आणि प्रा.निब्रड हे चारही शिक्षक आणि विनाअनुदानित तुकड्यांवरील शिक्षक पालकांना बोलावून हमीपत्र लिहून घेतात. शिकवणी वर्ग शाळेतच भरवून त्या बदल्यात प्रत्येक विद्यार्थ्यांकडून १० हजार याप्रमाणे रक्कम गोळा केली जाते. त्यातील प्रति विद्यार्थ्याप्रमाणे ठराविक रक्कम व्यवस्थापनाला मिळते. या शिवाय प्रा. टोंगे स्वत:च्या घरी सकाळी आणि सायंकाळी चार बॅचेसमध्ये शिकवणी घेतात. २५ हजार रूपये कोर्स असा दर आहे. एका बॅचमध्ये १५ ते २० विद्यार्थी या हिशेबाने वर्षाचे लक्षावधी रूपये ही प्राध्यापक मंडळी अवैध मार्गाने कमावतात. याच शाळेतील निब्रड नावाचे शिक्षक वरोरा येथे आपल्या घरी शिकवणी घेतात. अन्य शाळांमध्येही असाच प्रकार थोड्याअधिक फरकाने सुरू आहे. मुलांना शिकवणीसाठी चार ठिकाणी जावे लागू नये, अभ्यासाच्या धावपळ नको या हेतूने एकाच छताखाली असलेल्या या शिकवणींच्या सुविधेचा पालक नाईलाजाने स्विकार करतात. (जिल्हा प्रतिनिधी)