आदिवासींच्या आरक्षणाला हात लावल्यास महागात पडेल
By Admin | Updated: August 5, 2014 23:43 IST2014-08-05T23:43:42+5:302014-08-05T23:43:42+5:30
आदिवासी व धनगर समाज समाधानाने एकत्र राहात असताना काही असंतुष्ट पुढारी व संधीसाधू राजकारण्यांनी आरक्षणच्या नावावर धनगर समाजाला भडकविण्याचे काम सुरू केले आहे.

आदिवासींच्या आरक्षणाला हात लावल्यास महागात पडेल
गडचांदूर : आदिवासी व धनगर समाज समाधानाने एकत्र राहात असताना काही असंतुष्ट पुढारी व संधीसाधू राजकारण्यांनी आरक्षणच्या नावावर धनगर समाजाला भडकविण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे दोन समाजात दरी निर्माण होताना दिसत आहे.
आदिवासी हा शांत, संयमी असला तरी त्यांचा अंत पाहू नका. स्वत:च्या स्वार्थासाठी खऱ्या आदिवासींमध्ये बोगस व खोट्यांचा भरणा करणार असाल तर तो अन्याय कदापिही सहन केल्या जाणार नाही. आदिवासींच्या आरक्षणाला हात लावल्यास ते हात तोडायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही, असा इशारा गडचांदूर येथील बैठकीत आदिवासी बांधवांनी दिला.
माजी जि.प. सदस्य सिताराम कोडापे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला जि.प. चे समाज कल्याण सभापती नीळकंठ कोरांगे, माजी जि.प. सदस्य गोदरु पा. जुमनाके, आदिवासी उपयोजना नियोजन समितीचे अध्यक्ष बापूराव पा. मडावी माजी जि.प. सदस्य भिमराव मडावी, माजी पं.स. सभापती भिमराव मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच प्रभाकर गेडाम, श्यामराव कोटनाके, लिंगू कुंमरे, महेश टेकाम, गणपत कुमरे, चरणदास मेश्राम, माजी सरपंच बाबाराव पुरके, मरापे गुरुजी, मेश्राम गुरुजी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ९ आॅगस्टला दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन तहसीलदारांमार्फत राज्यपालांना निवेदन सादर करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.
१६ आॅगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी होऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढा देण्यास सर्वांनी सज्ज व्हावे, असे आवाहन करण्यात आले. प्रास्ताविक भारत आत्राम यांनी तर संचालन मारोती जुमनाके यांनी केले. आभार कुळसंगे यांनी मानले. सभेला समाजबांधव उपस्थित होते. (वार्ताहर)