रस्त्यावर बैलबंडी ठेवाल तर भरावा लागेल दंड
By Admin | Updated: February 24, 2015 01:56 IST2015-02-24T01:56:04+5:302015-02-24T01:56:04+5:30
खतांचे ढिगारे, रस्त्यावर घाण, बैलबंडी, सांडपाणी, रस्त्यांवर गुरे आदी चित्र

रस्त्यावर बैलबंडी ठेवाल तर भरावा लागेल दंड
रत्नाकर चटप ल्ल नांदाफाटा
खतांचे ढिगारे, रस्त्यावर घाण, बैलबंडी, सांडपाणी, रस्त्यांवर गुरे आदी चित्र गावागावांत आपल्याला नेहमी बघायला मिळते. यामुळे अनेकवेळा आरोग्याच्या समस्याही निर्माण होते. आपले गाव स्वच्छ दिसावे, गाव रोगमुक्त व्हावा, यासाठी बाखर्डी येथील युवकांनी वसा हाती घेतला आहे. एवढेच नाही तर, रस्त्यावर बैलबंडी ठेवल्यास ५०० रुपयांचा दंड भरावा लागेल, असा ठरावच ग्रामसभेने घेतला आहे. जिल्ह्यात असा ठराव घेणारी कदाचित ही पहिलीच ग्रामपंचात असावी. या ग्रामपंचायतीचे अनुकरण अन्य ग्रामपंचायतीने केल्यास जिल्ह्यातील प्रत्येक गाव सुटसुटीत आणि रोगमुक्त होणार आहे.
सध्या दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वत्र स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यात ग्रामीण परिसरही मागे नाही. कोरपना पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या बाखर्डी या गावातील काही युवकांनी स्वच्छता मोहीम सुरु केली आहे. प्रथम १० ते १५ युवकांनी पहाटे उठून रस्त्याची स्वच्छता करणे सुरु केले. त्यांचे कार्य बघून काही नागरिकांनीही यात सहभाग घेतला. बघता बघता स्वच्छता करणाऱ्यांचे हात वाढत गेले आणि आता तर गावातील महिलांनीही यात पुढाकार घेतला आहे. यातून गावातील रस्ते स्वच्छ केले जात आहे. विशेष म्हणजे, मागील अनेक वर्षांपासून नाल्यांमधील गाळ उपसण्याचेही काम युवकांनी हाती घेतले आहे.
आता ग्रामसभेनेही यात पुढाकार घेतला आहे. यासाठी काही ठरावही मंजुर करण्यात आले आहे. या ठरावामध्ये रस्त्यावरील बैलबंडीसाठी ५०० रुपयांचा दंडाचा ठराव चर्चेचा विषय बनला आहे.
गावात बैलबंडींची संख्या अधिक आहे. अनेकवेळा शेतकरी बैलबंडी रस्त्याच्या कडेला ठेवतात. बंडीला बैलांनाही बांधून ठेवल्या जाते. यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. आता ठराव घेतल्यामुळे यावर प्रतिबंध आला आहे. काहींनी रस्त्यावर बैलबंडी ठेवणे बंद केले आहे.
यामुळे रस्ते वाहतुकीसाठी खुले झाले आहे. याचसोबत गाातील काही महिला रस्त्याच्या कडेला कपडे धुतात. यामुळे गावातील रस्त्यांवर पाणी साचते. यावर युवकांनी उपाय शोधला आहे. रस्त्यावर दिसणारे दगड हटविणे सुरु केले आहे. तर काहींना दगड हटविण्याची विनंती करण्यात आली आहे. गाव स्वच्छ करण्यासाठी युवकांनी घेतलेला पुढाकार वाखाण्याजोगा आहे. प्रत्येक ग्रामपंचायतींनी असा पुढाकार घेतल्यास जिल्हा स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही.
गाव स्वच्छ करण्यासाठी युवकांसह ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, महिला मंडळ, गुरुदेव सेवा मंडळ तथा नागरिकांनीही सहभाग घेतला आहे.
अन्य ग्रामपंचायतींनी घ्यावा ठराव
४दिवसेंदिवस गावात वाहनांची संख्या वाढत आहे. त्यातच बैलबंडी, जनावरांनाही अगदी रस्त्यावर बांधून ठेवले जाते. यामुळे अनेकवेळा अपघातही होतात काही वेळी वाहतुकीची कोंडी होते. प्रत्येक ग्रामपंचायतींनी जर रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर दंड आकारला तर जिल्ह्यातील चित्र बदलले दिसेल. यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांनाही लागली सवय
४गावात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. यात विद्यार्थीही मागे नाही. शाळा परिसर किंवा रस्त्यावर कचरा दिसल्यास तो उचलून कचराकुंडीत टाकत आहे. या कामाला शिक्षकांचाही सहभाग मिळत आहे. त्यामुळे बालवयातच विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे येथे मिळत आहे. यासाठी सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त समिती सदस्य, ग्रामसेवकानेही सहभाग घेतला आहे.
परिसरातील नागरिकांचा
संकल्प
४बाखर्डी गावात स्वच्छता अभियान सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून गावातील चित्र बदलले आहे. आता परिसरात या गावाची चर्चा सुरु झाली आहे. काही ग्रामस्थ बाखर्डी येथे भेट देत आहे. आपल्याही गावात असे अभियान राबवू असा संकल्पही करीत आहे. कोरपना तालुक्यात ५३ ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतींनी सुद्धा स्वच्छता अभियान राबविणे आवश्यक आहे.