अतिरिक्त शिक्षक ठरविताना नियम डावलल्यास तीव्र आंदोलन
By Admin | Updated: June 21, 2016 00:48 IST2016-06-21T00:48:08+5:302016-06-21T00:48:08+5:30
शैक्षणिक सत्र २०१५-१६ च्या संच मान्यतेनुसार जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक ठरविताना शासन निर्णयाचे पालन व्हावे. सेवाज्येष्ठता, ...

अतिरिक्त शिक्षक ठरविताना नियम डावलल्यास तीव्र आंदोलन
शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचा इशारा
राजुरा : शैक्षणिक सत्र २०१५-१६ च्या संच मान्यतेनुसार जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक ठरविताना शासन निर्णयाचे पालन व्हावे. सेवाज्येष्ठता, बिंदुनामावली व विषयाची निकड लक्षात घेऊन शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन व्हावे, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांना देण्यात आले आहे. असे न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघाने दिला आहे.
यावेळी शिष्टमंडळात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, कार्याध्यक्ष लक्ष्मण धोडे, महामंडळ सरकार्यवाह जगदीश जुनघरी, दिगांबर कुरेकर, उपाध्यक्ष सुनील शेरकी यांची उपस्थिती होती.
सन २०१५-१६ च्या संच मान्यतेनुसार जिल्ह्यात ३४० शिक्षक, ३९ पर्यवेक्षक, १९३ उपमुख्याध्यापक, १४ मुख्याध्यापक असे एकूण ४५० शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. शिक्षक अतिरिक्त ठरवीत असताना शासन निर्णय २८ आॅगस्ट २०१५, ८ जानेवारी २०१६ व ७ मे २०१६ नुसार महाराष्ट्र राज्य शासन संहिता १९८१ मधील सूचनांचे पालन करून अतिरिक्त शिक्षक ठरविणे अपेक्षित होते. शासनाचे नियम, सेवाज्येष्ठता, बिंदुनामावलीय विषयाची निकड लक्षात घेऊन शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे अपेक्षित होते. मात्र असे झालेले नाही. त्यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय झालेला आहे व जिल्ह्यातील अन्यायग्रस्त शिक्षकांच्या तक्रारी संघटनेकडे आलेल्या आहेत. यामुळे कुठल्याही शिक्षकावर अन्याय होऊ नये, याची खबरदारी शिक्षणाधिकारी यांनी घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करताना कोणावरही अन्याय होणार नाही. अतिरिक्त ठरविण्याची प्रक्रिया व समायोजनाची प्रक्रिया पारदर्शी व्हावी. शिक्षकांचे १०० टक्के समायोजन होईपर्यंत नवीन पदभरतीस मान्यता देण्यात येऊ नये. परवानगी दिलेली असल्यास त्यांना मान्यता देण्यात येऊ नये. शिक्षक अतिरिक्त ठरवीत असताना व समायोजन करीत असताना संस्थांकडून व शिक्षण विभागाकडून शिक्षकावर अन्याय झाल्यास विदर्भ माध्यमिक संघ तीव्र आंदोलन करेल, असा इशारा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह सुधाकर अडबाले, जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे व जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)