मनुष्य माणुसकीने वागला तर ईश्वराची कृपा
By Admin | Updated: October 29, 2014 22:47 IST2014-10-29T22:47:35+5:302014-10-29T22:47:35+5:30
सर्व सजीवांमधून मनुष्य हा बुद्धिवादी आहे. आपले बरे वाईट तो जाणतो. मात्र स्वार्थी हेतु ठेवून काही जण इतरांप्रती आकस धरून दुसऱ्याचे वाईट आणि आपले चांगले करण्याच्या प्रयत्नात असतात.

मनुष्य माणुसकीने वागला तर ईश्वराची कृपा
स्वामी नरेंद्राचार्य महाराज : गोंडपिंपरीत प्रवचन सोहळा
गोंडपिपरी : सर्व सजीवांमधून मनुष्य हा बुद्धिवादी आहे. आपले बरे वाईट तो जाणतो. मात्र स्वार्थी हेतु ठेवून काही जण इतरांप्रती आकस धरून दुसऱ्याचे वाईट आणि आपले चांगले करण्याच्या प्रयत्नात असतात. मनुष्य कुठल्याही जाती धर्माचा असो मनुष्य जर मानुसकीने वागला तर त्याचेवर ईश्वराची कृपा होते. ईश्वर हा दयाळू असून सत्संग सान्निध्यातून आपण ईश्वर भक्ती करीत मोक्ष प्राप्तीकडे वळावे, असे प्रतिपादन स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी केले.
स्थानिक क्रीडा संकुलाच्या मागील पटांगणात चंद्रपूर जिल्हा सेवा मंडळातर्फे बुधवारी स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचे प्रवचन पार पडले. यावेळी ते भक्तांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी खा. हंसराज अहीर, माजी आमदार अॅड. वामनराव चटप, सुदर्शन निमकर, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत पराते, पं.स. सभापती रत्नमाला तोरे, उपसभापती रामचंद्र कुरवटकर, बबनराव निकोडे, तेलंगणाचे आमदार के. कोनप्पा, अशोक चिचघरे, बंडू माणूसमारे, सुभाष कासनगोट्टूवार, रविंद्र वेगीनवार उपस्थित होते. स्वामी नरेंद्राचार्य पुढे म्हणाले, प्रत्येक देहाचा अंत हा निश्चित असून प्रत्येकाने मोक्षप्राप्तीसाठी सत्याच्या माध्यमातून मोक्ष मार्ग मिळवावा. स्वप्नातही कुणाचे वाईट चिंतू नये. मग बघा आपल्या जीवनाला यशस्वी वाटचाल मिळणार की नाही, याची प्रचिती नरेंद्राचार्यांनी विविध अभंग गाऊन उपस्थितांना दिली. ईश्वर भक्तीमध्येच जगाचे कल्याण असून अध्यात्म हा ईश्वर भक्तीचा सर्वात सोपा मार्ग असल्याचेही स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांनी सांगितले. कार्यक्रमास हजारों भाविकांनी हजेरी लावून संत प्रवचन सोहळ्याचा लाभ घेतला. कार्यक्रमासाठी चंद्रपूर जिल्हा भक्त सेवा मंडळाने परिश्रम घेतले. यावेळी भक्त सेवा मंडळाचे वतीने गरजवंतांना शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)