नगरसेविकेवर कारवाई न केल्यास आंदोलन
By Admin | Updated: December 22, 2014 22:44 IST2014-12-22T22:44:13+5:302014-12-22T22:44:13+5:30
येथील तुकूम प्रभाग क्रमांक २ मधील भाजपाची नगरसेविका रत्नमाला सोपन वायकर यांनी आपल्याला मारहाण केली असून मागील काही दिवसांपासून त्यांचा हा प्रकार सुरु आहे. त्यामुळे वॉर्डातील

नगरसेविकेवर कारवाई न केल्यास आंदोलन
चंद्रपूर : येथील तुकूम प्रभाग क्रमांक २ मधील भाजपाची नगरसेविका रत्नमाला सोपन वायकर यांनी आपल्याला मारहाण केली असून मागील काही दिवसांपासून त्यांचा हा प्रकार सुरु आहे. त्यामुळे वॉर्डातील नागरिक त्रस्त झाले आहे. यासंदर्भात पोलिसात तसेच भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. मारहाण करणाऱ्या नगरसेविकेला निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
येथील रमेश भलमे हे वॉर्डातील स्वच्छता करावी याबाबत नगरसेविका रत्नमाला वायकर यांना सांगण्यासाठी गेले असता. नगरसेविका तसेच त्यांचे पती सोपान वायकर यांनी भलमे यांना मारहाण केली. एवढेच नाही तर दोन वर्षापूर्वी एका वृद्ध महिलेने नगरसेविकेकडे पूर आल्यासंदर्भात नुकसान भरपाईबाबत विचारणा केली असता त्यांनाही मारहाण करण्यात आली होती.
यासंदर्भात त्या वृद्धेने पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी आपल्यावर दबाव आणून या प्रकरण थांबविण्याचे सांगितले असल्याचे बेबी रामटेके यांनी यावेळी सांगितले.
नागरिकांना मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्या नगरसेविकेवर कारवाई करावी, अशी मागणी नामदेव धानोरकर यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल देशकर यांच्यासह वरिष्ठांकडे केली आहे. तसेच पोलिसातही तक्रार देण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला बेबी रामटेके, अशोक वाटेकर, अरविंद सातपूते, रमेश भलमे, सुधाकर शेंडे यांच्यासह वॉर्डातील नागरिक उपस्थित होते. (वार्ताहर)