जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयु, शिशु केअर युनिट अपडेट करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:21 IST2021-01-10T04:21:34+5:302021-01-10T04:21:34+5:30
चंद्रपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील नवजात शिशू केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू ...

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसीयु, शिशु केअर युनिट अपडेट करणार
चंद्रपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील नवजात शिशू केअर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रूग्णालयातील आयसीयू, शिशू केअर युनिट अपडेट करण्याचा शनिवारी तातडीने निर्णय घेण्यात आला. या कक्षाचे नियमानुसार ऑडिट यापूर्वीच झाले. मात्र, अशा घटना कदापि घडू नये, यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार चेकलिस्टप्रमाणे सर्व यंत्रणांची पुन्हा तपासणी केली जाणार आहे.
बाळाचा जन्म झाल्यानंतर आरोग्याची विशेष काळजी घेण्यासाठी प्रत्येक रुग्णालयात आयसीयू, शिशू केअर युनिट असते. याशिवाय, गरोदर व स्तनदा मातांसाठीही अशा प्रकारचे केअर युनिट रुग्णालयात आहेत. हा कक्ष अंत्यत संवेदनशील असल्याने त्यातील प्रत्येक तांत्रिक व आरोग्य साधन सामग्री तसेच फायर सेफ्टी ऑडिट केले जाते. त्यासाठी राज्य शासनाने निकष ठरवून दिले. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशू केअर युनिटमध्ये अचानक आग लागल्याने दहा बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेनंतर राज्य सरकारने सर्व रुग्णालयांना आयसीयू व नवजात शिशू केअर युनिटची तपासणी करण्याचा आदेश जारी केला. त्यानुसार चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाने शनिवारी बैठक घेतली. जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. निवृत्ती राठोड यांनी सर्व विभागप्रमुखांना खबरदारीच्या सूचना केल्या.
आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व मॉकड्रिल
संकटप्रसंगी कशी खबरदारी घ्यावी, याबाबत आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय मॉकड्रिल करण्यात येेईल. आयसीयूमधील सर्व वीज उपकरणे, एचडीयू, ऑक्सिजन प्लान्ट, सिलिंडर व अन्य साधनांची तपासणी केल्या जाईल. रुग्णालयाची इमारत बांधकाम सरंचना व वीज उपकरणांबाबत दुरुस्ती व अडचणी दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला तत्काळ कळविण्याचा निर्णय घेण्यात आला.
फायर सेफ्टी ऑडिटचा तडकाफडकी आदेश
राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्तांनी सर्व रुग्णालयाचे फायर सेफ्टी ऑडिट करून घेण्याचा आदेश आजच सायंकाळी मिळाला. अधिनस्थ आरोग्य संस्थांच्या मागील पाच वर्षांतील फायर ॲक्सिडन्टचा संस्थानिहाय आढावा व उपाययोजनांची माहिती सादर करण्याचे निर्देश जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्रुटी अहवालाच्या अनुषंगाने उपचारात्मक पूर्तता उपाययोजना करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तातडीने निधी उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या.
कोट
भंडारा येथील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आज सामान्य रुग्णालयाचा आढावा घेण्यात आला. अशा घटना घडू नये, यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाईल. आरोग्य सेवा आयुक्त व राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालकांच्या निर्देशानुसार रुग्णालयाशी निगडित महत्त्वपूर्ण सहा बाबींची नव्याने तपासणी करण्यात येणार आहे.
-डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक, चंद्रपूर