मला जिवंत जाळण्याचा डाव होता
By Admin | Updated: April 2, 2015 01:28 IST2015-04-02T01:28:35+5:302015-04-02T01:28:35+5:30
१८ मार्चच्या रात्री पेट्रोल ओतून आपले राहते घर जाळण्यात आले. पोलिसांना पंचनाम्यात पेट्रोलची डबकी आणि स्कॉर्फही सापडला.

मला जिवंत जाळण्याचा डाव होता
चंद्रपूर : १८ मार्चच्या रात्री पेट्रोल ओतून आपले राहते घर जाळण्यात आले. पोलिसांना पंचनाम्यात पेट्रोलची डबकी आणि स्कॉर्फही सापडला. हा प्रकार आपणास जीवंत जाळण्यासाठीच होता. असे असूनही पंधरा दिवसांनंतरही पोलिसांचा तपास पुढे न सरकल्याने आता न्याय तरी कुणाकडे मागायचा, असा प्रश्न ज्येष्ठ समाजसेविका सुमन चांदेकर यांनी बुधवारी जिल्हा पोलीस अधीक्षकांपुढे उपस्थित केला.
सुमन चांदेकर या गुरूदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्या असून माजी नगरसेविकाही आहेत. १८ मार्चच्या रात्री बाबूपेठमधील आपल्या घरी नेहमीप्रमाणेच त्या एकट्याच झोपलेल्या होत्या. अडीच वाजताच्या सुमारास त्यांचे बाबूपेठमधील राहते घर जाळण्यात आले होते. झोपेत असतानाच कुणीतरी खिडकीतून पेट्रोल ओतून आग लावली. कसाबसा जीव वाचवून त्या मागच्या दाराने बाहेर पडल्या. मात्र आगीत घर जळाले. घटनेनंतर शहर पोलीस, अगनीशामक दलाने येवून रात्री ३.३० वाजेपर्यंत आग विझविली. यावेळी पोलिसांना पंचनाम्यात स्कार्फ आणि पेट्रोलची रिकामी डबकी मिळाली.
बयानानंतर चांदेकर यांनी दोन व्यक्तींची संशयित म्हणून नावेही पोलिसांना सांगितली. मात्र अद्याप कुणालाही अटक झालेली नाही.
हा प्रकार गंभीर असूनही तपास गंभीरपणे होत नसल्याबद्दल त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन यांच्याजवळ खंत व्यक्त केली. गुरूदेव सेवा मंडळाच्या जागेच्या वादातून हा प्रकार घडला असून ३१ मार्चला न्यायाालयाची तारीख होती. खटल्याशी संबंधित कागपत्रासह आपल्यालाही जाळून मारण्यासाठीच ही आग लावण्यात आली, असा स्पष्ट आरोपही सुमन चांदेकर यांनी यावेळी केला. आपण आजवर समजातील सर्व घटकांसाठी कार्य केले. राष्ट्रसंतांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार केला. आपल्यासारख्या वयोवृद्ध समाजसेविकेशी असा प्रकार घडूनही तपासाला विलंब व्हावा, याबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले. या तक्रारीचे निवेदनही यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षकांना देण्यात आले. संबंधित गुन्हेगारांना अटक करून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळ, नाभिक प्रेमज्योती महिला मंडळ, नाभिक सलून असोसिएशन आणि नाभिक समाजाच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून दिला आहे.
दरम्यान, जिल्हा प्रशासनालाही यावेळी शिष्ठमंडळाने निवेदन दिले. निवासी जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे यांनी हे निवेदन स्विकारले. या प्रकरणी लक्ष घालून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन निवासी जिल्हाधिकारी कुळमेथे आणि जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन यांनी दिले.
शिष्टमंडळात महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष दीपक नक्षणे, प्रदेश उपाध्यक्ष श्याम राजुरकर, नाभिक प्रेमज्योती महिला मंडळाच्या अध्यक्ष संध्या कडूकर, सरोज चांदेकर, भानुमती बडवाईक, शालुताई चल्लीरवार, नाभिक सलून असोसिएशनचे अध्यक्ष विजय कोंडस्कर, सचिव रमेश हनुमंते, अरूण जमदाडे, मनोज पिसदुरकर, दिनेश एकवनकर आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)