पतीला कटकारस्थान करून फसविण्यात आले
By Admin | Updated: November 4, 2015 00:54 IST2015-11-04T00:54:56+5:302015-11-04T00:54:56+5:30
येथील साप्ताहिकाचे पत्रकार शालिक सहारे यांची पार्श्वभूमी गुन्हेगार स्वरूपाची नसताना केवळ पोलीस निरीक्षकाविरुद्ध आवाज उठवून...

पतीला कटकारस्थान करून फसविण्यात आले
शीला सहारे यांचा आरोप : पत्रकार मारहाण प्रकरण
ब्रह्मपुरी : येथील साप्ताहिकाचे पत्रकार शालिक सहारे यांची पार्श्वभूमी गुन्हेगार स्वरूपाची नसताना केवळ पोलीस निरीक्षकाविरुद्ध आवाज उठवून बातम्या प्रकाशित केल्या व त्याची लेखी तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत केल्याने माझ्या पतीला पोलीस निरीक्षकांनी कटकारस्थान रचून फसविण्यात आल्याचा आरोप शालीक सहारे यांच्या पत्नी शिला सहारे यांनी केला आहे.
त्यांनी पत्रकात नमुद केल्यानुसार म्हटले आहे, पोलीस निरीक्षक के.डी. नगराळे यांच्या विरुद्ध अनेक गंभीर गुन्हे बेकायदेशीररित्या दडपल्याप्रकरणी त्यांच्या तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक व विशेष पोलीस महानिरीक्षक, पालकमंत्री व मुख्यमंत्री यांच्याकडे केल्या आहेत. तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांची खत प्रकरणात झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपींना पोलीस निरीक्षकांना अभय दिले होते. त्या विरुद्ध माझ्या पतीने बातम्या प्रकाशित करुन प्रकरण उचलून धरले, असे म्हटले आहे.
ब्रह्मपुरीत मागील पंधरवड्यात नऊ लाखाची दारू हस्तगत करून त्यात आरोपीला अटक झाल्याने त्याला हाताशी धरुन माझे पती विरुद्ध खंडणी व अनुसूचित जाती जमाती कायद्याखाली अटक करून पोलीस कोठडीत पाठविले. आहे हे केवळ वैयक्तिक वचपा काढण्यासाठी पोलीस निरीक्षकांनी केले आहे. कारण मी अनुसूचित जातीची असून पती शालीक सहारे यांनी माझ्याशी लग्न केले आणि आमचा संसार सुरळीत आहे. जर त्यांना या जातीची घृणा असती तर त्यांनी माझ्याशी लग्नच केले नसते. त्यामुळे या कायद्याचा वापर सर्रास खोटे स्वरूपाचा माझ्या पतीवर लावल्या गेला आहे.
माझ्या पती विरुद्ध गुन्ह्याची नोंद होताच तपास न करता केवळ एफआयआरच्या आधारे तत्काळ अटक केली आणि त्याबाबत आम्हाला सुचना दिली नाही. पतीला भेटायला गेली असता, मला पोलीस निरीक्षकांनी भेटू दिले नाही. ही संपूर्ण बाब बेकायदेशिर असून ठाणेदार व अवैध धंदेवाले यांनी जाणीवपूर्वक कट रचून, कायद्याचा दुरुपयोग करुन माझ्या पतीला फसविले असल्याचा आरोप शिला सहारे यांनी पत्रकाद्वारे केला आहे. (तालुका प्रतिनिधी)