दारू तस्करीत अडकला भाजपा नगरसेविकेचा पती
By Admin | Updated: May 6, 2015 01:23 IST2015-05-06T01:23:56+5:302015-05-06T01:23:56+5:30
चंद्रपूर येथील भाजपाच्या नगरसेविका स्वरूपा असराणी यांचा पती गणेश लिलाराम असराणी याला मंगळवारी दारू तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली.

दारू तस्करीत अडकला भाजपा नगरसेविकेचा पती
वरोरा : चंद्रपूर येथील भाजपाच्या नगरसेविका स्वरूपा असराणी यांचा पती गणेश लिलाराम असराणी याला मंगळवारी दारू तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या कारवाईत पोलिसांनी त्याच्याजवळून २६ हजार रुपयांची विदेशी दारू व तस्करीसाठी वापरण्यात आलेली रुग्णवाहिका (एमएच-३३ जी-६७५) जप्त केली आहे. ही कारवाई वरोराचे ठाणेदार मल्लिकार्जून इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लांजेवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास नागपूर-चंद्रपूर मार्गावरील खांबाडा येथे उभारण्यात आलेल्या चौकीतील पोलिसांनी ही कारवाई केली.
गणेश असराणी हा रुग्णवाहिका घेऊन नागपूर मार्गाने वरोऱ्याकडे येत असताना खांबाडा येथे पोलिसांनी रुग्णवाहिका अडविली. तपासणी केली असता, त्या रुग्णवाहिकेत २६ हजार रुपये किंमतीची विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी लगेच गणेश असराणी याला अटक केली आहे. तो चंद्रपूर येथील सिव्हील लाईन वॉर्डाच्या भाजपाच्या नगरसेविका स्वरुपा असराणी यांचा पती आहे. चंद्रपुरातील रामनगर परिसरातील सिंधी कॉलनीतील रहिवासी असलेला गणेश असराणी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाल्यानंतर दारू विक्रीच्या अवैध व्यवसायात उतरला, असे सांगितले जाते. (प्रतिनिधी)