पदासाठी घाई; कामात मात्र दिरंगाई
By Admin | Updated: July 5, 2014 23:30 IST2014-07-05T23:30:40+5:302014-07-05T23:30:40+5:30
शालेय व्यवस्थापन समितीला सध्या ग्रामपंचायत सदस्यांएवढे महत्त्व प्राप्त झाले आहे. काही गावात तर मतदानातून निवड झालेले शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य अनेक गावाच्या शाळांमध्ये प्रत्यक्ष

पदासाठी घाई; कामात मात्र दिरंगाई
शाळा व्यवस्थापन समिती : अंकुश लावण्याची गरज
देवाडा (खुर्द) : शालेय व्यवस्थापन समितीला सध्या ग्रामपंचायत सदस्यांएवढे महत्त्व प्राप्त झाले आहे. काही गावात तर मतदानातून निवड झालेले शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य अनेक गावाच्या शाळांमध्ये प्रत्यक्ष कामात सहभाग घेण्यासाठी कमालीची घाई करतात. कामात मात्र मागेच राहतात. त्यामुळे पदासाठी घाई; कामात मात्र दिरंगाई असे चित्र पोंभूर्णा तालुक्यातील बऱ्याच शाळांमध्ये दिसून येते.
अनेक गावात व्यवस्थापन समितीचे कामकाज पूर्ण करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक स्वत: किंवा विद्यार्थ्यांकडून या सदस्यांच्या घरी जावून सह्यांचे सोपस्कार पूर्ण करतात. अगदी केंद्रीय शाळा पातळीवर या सदस्यांसाठी होणाऱ्या विविध प्रशिक्षणासाठीसुद्धा तासभर जावून या अशी विनवणी करण्याची वेळ मुख्याध्यापकांवर येत आहे. अर्थात याला काही गावातील समित्या अपवाद आहेत. व्यवस्थापन समिती सदस्यांच्या निवडी होत असताना विद्येच्या प्रांगणात गलीच्छ राजकारण पहावयास मिळते तर कधीकाळी पोलीस बंदोबस्ताचीही मदत घ्यावी लागते.
काही शाळांमध्ये अध्यक्ष निवडताना सदस्यांना सहलीवर पाठविण्याचा उद्योग राजकीय गोटातून केला जातो. मात्र ही सर्व खटाटोप केली जात असताना शाळा व्यवस्थापन समितीच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. शाळा व्यवस्थापन समितीला महत्त्व व अधिकार आहेत. पण ते राबविण्याची आत्मीयता नाही. ज्या सदस्यांना प्रजासत्ताक किंवा स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणासाठी शाळेत उपस्थित राहण्यासाठी वेळ मिळत नाही, अशा प्रकारामुळे शाळांच्या गुणवत्तेबाबत अपेक्षा तरी काय कराव्यात, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या समितीवर सदस्य निवडताना ज्यांची मुले या शाळेत शिकत आहेत त्यांचीच समितीत निवड करावी असा निकष आहे. पोंभूर्णा तालुक्यातील काही शाळांमधील शाळा व्यवस्थापन समित्या चांगले काम करीत आहेत. मात्र ज्या ठिकाणच्या शाळा व्यवस्थापन समिती कामच करीत नाही. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी या समितीत काम करणे आवश्यक आहे. हे करताना शाळा व्यवस्थापन समितीनेही लक्ष घालण्याची गरज आहे. या शाळा व्यवस्थापन समित्यांवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. (वार्ताहर)