शेतकऱ्यांसह आप्तस्वकीयांसह नातेवाइकांना हिवाळा सुरू झाल्यानंतर गुलाबी व कुडकुडणाऱ्या थंडीत शेतात पेटत्या शेकोटीजवळ बसून ज्वारीच्या कणसांना भाजून खाण्याची मजा आनंददायीच असायची. परंतु अलीकडे शेतातील बदलत्या पीक पद्धतीने हुरडा पार्टी कालबाह्य झाल्याने शेतकरी परिवाराला मायेच्या धाग्यात गुंफणारा धागाच तुटला आहे.
दहा वर्षांपासून ग्रामीण भागात सर्वत्र ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात असायचा. त्यामुळे शेतशिवार ज्वारीच्या धांड्यानी बहरलेले दिसायचा. पूर्वी हिवाळा आला रे आला की, सर्वत्र हुरडा पार्टीची रेलचेल असायची. यानिमित्ताने शहरात असलेले शेतकऱ्यांच्या नातेवाईक हुरडा खाण्यासाठी खास गावाकडे वळायचे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागात स्नेहबंध वृद्धिंगत व्हायचे; परंतु अलीकडे कापूस व सोयाबीनसारख्या नगदी पिकांचे उत्पादन वाढल्याने शेतकरी ज्वारी लागवडीकडे दुर्लक्ष करीत आहे.
रोही, रानडुकरे व रानटी पशू तथा पक्ष्यांवर अंकुश ठेवणे कठीण झाल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी लागवडीकडे पाठ फिरवली आहे. अनेक भागात केवळ जनावरांना चारा म्हणून कडबा मिळावा यासाठीच ज्वारी पेरतात. त्यामुळे ज्वारीची हुरडा पार्टी थंड बस्त्यात पडल्याने खवय्यांना यानिमित्ताने खेड्यात हुरडा पार्टीत मिळणाऱ्या वांग्याचे भरीत, मिरचीचा ठेचा, तिळाची चटणी, दह्याची चटणी अशा पकवानांना वंचित व्हावे लागत आहे.
कधीकाळी सामान्य शेतकऱ्यांना स्वत:च्या कुटुंब व आप्तांच्या मनोमीलनात तथा राजकारण्यांच्या राजकीय घडामोडीत मोठी भूमिका बजावणारी हुरडा पार्टी कालबाह्य झाली आहे.