शिकार केली पण तोच झाला शिकार; बिबट पडला विहिरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2022 23:14 IST2022-11-04T23:13:39+5:302022-11-04T23:14:19+5:30
ब्रह्मपुरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्याच्या घटना नित्याच्याच आहेत. या भागात बिबट्याचीही मोठी दहशत आहे. गावातून लहान मुलांना बिबट्याने खेळताना उचलून नेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. बिबट रात्री शेळ्या वा कोंबड्यांवर ताव मारण्यासाठी गावात येतात. किटाळी (बोडदा) हे जंगलव्याप्त गाव आहे. या गावात रात्रीच्या सुमारास एक बिबट शिकार शोधण्यासाठी आला.

शिकार केली पण तोच झाला शिकार; बिबट पडला विहिरीत
रवी रणदिवे
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : शिकारीच्या शोधात गावाच्या परिसरात आलेला बिबट विहिरीत पडल्याची घटना शुक्रवारी ब्रह्मपुरी तालुक्यातील ब्रह्मपुरी दक्षिण वनपरिक्षेत्रातील किटाळी गावात पहाटेला घडली. गावकऱ्याला पडल्याचा आवाज आला असता विहिरीत चक्क बिबट दिसला. तो विहिरीबाहेर पडण्यासाठी धडपडत होता. ही बाब वनाधिकाऱ्यांना दिली. यानंतर वनविभागाचा सुमारे ३० जणांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याची विहिरीतून सुखरूप सुटका करण्यात वनविभागाला यश आले. यानंतर त्याच जंगलात बिबट्याला सोडण्यात आले.
ब्रह्मपुरी तालुक्यात वाघाच्या हल्ल्याच्या घटना नित्याच्याच आहेत. या भागात बिबट्याचीही मोठी दहशत आहे. गावातून लहान मुलांना बिबट्याने खेळताना उचलून नेल्याच्या घटना घडलेल्या आहेत. बिबट रात्री शेळ्या वा कोंबड्यांवर ताव मारण्यासाठी गावात येतात. किटाळी (बोडदा) हे जंगलव्याप्त गाव आहे. या गावात रात्रीच्या सुमारास एक बिबट शिकार शोधण्यासाठी आला. त्याने गावातच कोंबड्याची शिकार केली. शिकार तोंडात घेऊन जंगलाच्या दिशेने धूम ठोकत असताना बिबट संतोष मेश्राम यांच्या घराशेजारील एका खोल विहिरीत पडला. पडल्याचा आवाज ऐकूण संतोष विहिरीजवळ गेला असता त्याला बिबट पडल्याचे दिसले. कठड्यापासून सुमारे १५ फूट खोल पाणी असल्यामुळे त्याला बाहेर निघता येत नव्हते. बिबट विहिरीतून बाहेर निघण्यासाठी धडपडत असल्याचे दिसले. माहिती होताच गावकऱ्यांनी विहिरीजवळ एकच गर्दी केली. याबाबतची माहिती वनविभागाला देण्यात आली.
ब्रह्मपुरी दक्षिणचे वनपरिक्षेत्राधिकारी शेंडे, उत्तरचे वनपरिक्षेत्राधिकारी गायकवाड, रिसर्चचे राकेश आहुजा तसेच सिंदेवाही येथील वनविभागाचा ताफा लगेच घटनास्थळी दाखल झाला. घटनास्थळी असलेली गर्दी बाजुला करून विहिरीत मोठ्या शिताफीने पिंजरा सोडला.
बिबट अलगद त्या पिंजऱ्यात शिरताच दार बंद केले. पिंजरा बाहेर काढून त्याची तपासणी केली. तो सुखरुप असल्याचे पाहून त्यांला जंगलाच्या दिशेने मुक्त करण्यात आले.