बांबू कटाई कामगारांवर उपासमारीची पाळी
By Admin | Updated: March 2, 2015 01:09 IST2015-03-02T01:09:35+5:302015-03-02T01:09:35+5:30
वनप्रकल्प विभाग मध्य चांदा बल्लारपूरअंतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय तोहोगाव क्षेत्रात गेल्या तीन महिन्यांपासून बांबू कटाईचे काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना वेतन देण्यात आले नाही.

बांबू कटाई कामगारांवर उपासमारीची पाळी
गोंडपिपरी : वनप्रकल्प विभाग मध्य चांदा बल्लारपूरअंतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय तोहोगाव क्षेत्रात गेल्या तीन महिन्यांपासून बांबू कटाईचे काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना वेतन देण्यात आले नाही. परिणामी या कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट ओढावले आहे. बँकेत पैसे जमा न झाल्याचे कारण पुढे करून अधिकारी व कर्मचारी वेळ मारून नेत असल्याने शेकडो कामगारांनी चक्क तोहोगाव वनपरिक्षेत्र कार्यालय परिसरात गेल्या १२ ते १५ दिवसांपासून ठिय्या मांडला आहे.
ठिय्या मांडणाऱ्या कामगारांना उघड्यावर संसार थाटावा लागला असुन पहाटेची थंडी, दुपारची उन सोसत पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अधिकारी मात्र ‘मिटींग’चे कारण पुढे करून गैरहजर रहात असल्याची व्यथा अन्यायग्रस्त कामगारांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.
महाराष्ट्र राज्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट मंडला यासह गोंदिया या जिल्ह्यातून शेकडो कामगार रोजगाराच्या शोधात बांबु कटाईचे काम करण्याकरिता तालुक्यातील तोहोगाव वनविकास महामंडळाच्या वनपरिक्षेत्रात दाखल झाले. डिसेंबर २०१४ पूर्वीपासून सदर वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४९, ३६, २५, २४, ३७ बांबू कटाईचे काम जोमात सुरू आहे. यामुळे परप्रांतातून दाखल झालेल्या कामगारांनी या क्षेत्रामध्ये दिवसरात्रं घाम गाळून कुटुंबासह बांबू कटाईचे काम पूर्ण केले.
याच दरम्यान बँकेत पैसे जमा झाले नसल्याचे कारण पुढे करित वनपरिक्षेत्र अधिकारी यू.बी. गुडपल्ले यांनी कामगारांच्या मागणीनुसार कामानुरूप मोबदला न देता केवळ आठवडी बाजाराच्या दिवशी सप्ताह वेतनाच्या नावावर दीडशे ते दोनशे रुपये देण्याचे आश्वासन देऊन बांबु कटाईचे काम सुरूच ठेवण्याचे आदेश दिले. कामगारांकडून कामे करून घेणाऱ्या वनरक्षक सीमा आत्राम, वनमजुर बंडू खामणकर, वनरक्षक सतीश दवणे यांनीही कामगारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून पैसे देण्याची वेळ येताच टाळाटाळ केल्याचे कामगारांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
याच आठवड्यात होळी सण येत आहे. बांबु कटाई कामगार कामे आटपून सण उत्सवाकरिता गावी परत जाण्याच्या तयारीत असताना अधिकारी गुडपल्ले व कामे करून घेणारे वनरक्षक व वनमजूर यांनी कामगारांपुढे येण्याचे टाळले. त्यामुळे शेकडो कामगारांनी वेतनाकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय तोहोगाव परिसरातच कुटुंबासह मुक्काम ठोकला आहे.
उसणवारीच्या पैशातून व उधारीतून धान्य खरेदी करून हे कामगार पोटाची खळगी भरत असल्याचे विदारक चित्र परिसरात दिसून आले.
तळ ठोकणाऱ्या कामगारांमध्ये महिलांसह छोटी बालके व बालकांचा समावेश आहे. गत दीड ते दोन महिन्यापूर्वी ३०० हून अधिक कामगारांना हिवतापासारख्या आजारालाही सामोरे जावे लागल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रातून मिळाली. वनविकास महामंडळाकडे या शेकडो कामगारांचे लाखो रुपयांचे वेतन थकीत आहे. यासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधी वनपरिक्षेत्र अधिकारी यू.बी. गुडपल्ले यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता, मिटींग सुरू असल्याचे कारण सांगून संपर्क तोडला. (तालुका प्रतिनिधी)