मुख्य रस्त्यावरील शंभर वर्षे जुनी झाडे तोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:26 IST2021-03-25T04:26:45+5:302021-03-25T04:26:45+5:30
राजुरा : राजुरा शहरातील रेल्वे फाटक ते राजुरा बसस्थानक या मुख्य रस्त्यावरील सुमारे सहा झाडे तोडण्याचे काम राजुरा नगरपालिकेने ...

मुख्य रस्त्यावरील शंभर वर्षे जुनी झाडे तोडली
राजुरा : राजुरा शहरातील रेल्वे फाटक ते राजुरा बसस्थानक या मुख्य रस्त्यावरील सुमारे सहा झाडे तोडण्याचे काम राजुरा नगरपालिकेने आज सुरू केले. रस्त्याकडेला सुमारे शंभर वर्षे जुनी असलेली ही झाडे नियमबाह्य रितीने तोडण्यात आली, असा आरोप सृजन नागरिक मंचने केला असून, त्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
राजुरा शहरात निजामकाळापासून अनेक मोठी झाडे येथे डौलाने उभी आहेत. मात्र यातील काही झाडे यापूर्वी राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी रस्त्यावर आल्याने तोडण्यात आली. आता रस्ता पुन्हा रूंद झाल्याने व रहदारीला त्रास होत असल्याचे कारण दाखवून पुन्हा सहा मोठी झाडे तोडण्याचे काम मंगळवारपासून सुरू झाले. मंगळवारी चंद्रपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील उपजिल्हा रुग्णालयासमोरील, नागराज कॅफेसमोरील, जवाहरनगर येथील व कर्नल चौक येथील प्रत्येकी एक याशिवाय रामनगर वॉर्डातील एक व देवाळकर यांच्या घरातील सागाचे मोठे झाड तोडण्याचे आदेश नगरपालिकेने दिले आहेत.
बॉक्स
यापूर्वीही झाला होता प्रयत्न
राजुरा नगरपालिकेने रस्त्याला अडथळा होतो म्हणून यापूर्वीही झाडे तोडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी येथील सामाजिक कार्यकर्ते मिलिंद गड्डमवार यांनी आक्षेप घेतल्यानंतर हे काम थांबविण्यात आले होते. आता नगरपालिकेने वृत्तपत्रात जाहिरात देऊन आक्षेप न आल्याचे सांगत कोरोना काळात ही झाडे तोडण्याचा आदेश दिला.
वास्तविक या झाडांमुळे रहदारीला काही फरक पडत नव्हता. उलट शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने सुरक्षित वाहतुकीला बाधा निर्माण झाली आहे. निजामाच्या काळातील शंभर वर्षे जुनी झाडे तोडल्याने अनेक नागरिकांनी नापसंती व्यक्त केली आहे.