बाप्पांच्या स्थापनेसाठी दीड हजारावर मंडळे सज्ज
By Admin | Updated: September 15, 2015 01:19 IST2015-09-15T01:19:31+5:302015-09-15T01:19:31+5:30
येत्या १७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार असून सार्वजनिक गणेश मंडळाकडून यासाठी सुरू असलेली

बाप्पांच्या स्थापनेसाठी दीड हजारावर मंडळे सज्ज
चंद्रपूर : येत्या १७ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार असून सार्वजनिक गणेश मंडळाकडून यासाठी सुरू असलेली तयारी अखेरच्या टप्प्यात आहे. मंडप उभारणी आणि सजावटींच्या कामाला वेग आहे. जिल्ह्यात दीड हजारावर सार्वजनिक गणपतीची स्थापना होणार असून १० हजारांपेक्षा अधिक घरगुती गणपतींची स्थापना करण्यात येणार आहे. ही माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल ताजने यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
दरवर्षीच चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यातही चंद्रपूर शहरातील गणेशोत्सव जिल्हाभरातील भक्तांच्या आकर्षणाचा विषय असतो. विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी तर जिल्ह्यातील भाविकांची अलोट गर्दी उसळते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात उत्सवादरम्यान, कुठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी तगड्या पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. उत्सवादरम्यान, कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने काही उपाययोजनाही पोलिसांनी आखल्या आहेत. यंदाचा गणेशोत्सव दारू विरहीत साजरा व्हावा, यासाठी पोलिसांनी प्रयत्न चालविले आहेत. गणेशाची स्थापना मिरवणूक व विसर्जन मिरवणुकीत मद्यप्राशन करणाऱ्या भक्तावर पोलिसांची विशेष नजर असणार आहे. जिल्ह्यात दारूबंदी असल्याने गणेशोत्सवादरम्यान, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दारू तस्करी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे उत्सवादरम्यानच्या नियमित ड्युटीसोबतच पोलिसांपुढे दारू तस्करी रोखण्याचे मोठे आव्हानही पेलावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
छेडखानींवर करडी नजर
४चंद्रपूर शहरातून निघणारी मिरवणूक पाहण्यासाठी जिल्हाभरातून भाविक चंद्रपुरात दाखल होतात. शहरात मोठी गर्दी होते. याचाच फायदा घेत काही गुंडप्रवृत्तीचे विकृत तरूण या मिरवणुकीत दाखल होतात. त्यांच्याकडून युवतींची छेडखानी करण्याचे प्रकारही घडतात. या युवकांच्या बंदोबस्तासाठी महिला पोलीस शिपायी तैनात राहणार आहेत. विशेष म्हणजे या महिला पोलीस खासगी गणवेशात असतील.
दारू रोखण्यासाठी विशेष पोलीस पथक
४गणेशोत्सवाच्या पर्वावर परजिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दारूची आयात केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी दारू तस्कर व विक्रेते यांच्याविरुद्ध तगडी फिल्डींग लावली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत विशेष पथक तयार करण्यात आले असून त्यात एक अधिकारी व १० पोलीस शिपाई कार्यरत राहतील. हे पथक डोळ्यात तेल घालून दारू विक्री व तस्करीवर नियंत्रण ठेवतील.
तगडा पोलीस बंदोबस्त
४गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. यासाठी १५० पोलीस अधिकारी, दोन हजार ७०० पोलीस कर्मचारी बंदोबस्तात राहणार आहे. यासोबतच गृहरक्षक दलाचे ७०० जवान तैनात राहणार आहेत. त्यात ६०० पुरूष व १०० महिलांचा समावेश आहे.
आटीबीपीची तुकडीही येणार
४चंदपूर जिल्ह्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष बंदोबस्तासाठी आयटीबीपी (इंदौर तिबेटीयन बॉर्डर पोलीस) ची एक तुकडीही तैनात असणार आहे. उत्सवाच्या दहाही दिवस ही तुकडी स्थानिक पोलिसांच्या मदतीला राहणार आहे.