शेकडो पाखरांची शिकार
By Admin | Updated: December 5, 2015 00:52 IST2015-12-05T00:52:49+5:302015-12-05T00:52:49+5:30
विस्तीर्ण पसरलेल्या झाडांच्या फांद्यांमध्ये घरटे तयार करून बसलेल्या पक्ष्यांवर मागील काही दिवसांपासून शिकाऱ्यांची वक्रदृष्टी पडली आहे.

शेकडो पाखरांची शिकार
वनविभागाची कारवाई : नदीपात्रात जाळाने पकडतात पाखरे
ब्रह्मपुरी: विस्तीर्ण पसरलेल्या झाडांच्या फांद्यांमध्ये घरटे तयार करून बसलेल्या पक्ष्यांवर मागील काही दिवसांपासून शिकाऱ्यांची वक्रदृष्टी पडली आहे. झाडांवरील हे पक्षी जवळच्याच नदीपात्रात गेले की त्यांना जाळ्यात पकडून मारले जात आहे. यात शेकडो पक्ष्यांचा अकारण जीव जात आहे.
ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या अऱ्हेरनवरगाव नदीपात्रात चंदनेश्वर, चंदन, नाकेर, यासारखे पक्षी वास्तव्यास आहेत. परंतु या नदीपात्रात जाळ टाकून शिकाऱ्यांनी या पक्ष्यांची शिकार करणे सुरू केले आहे. झाडावरील आपल्या घरट्यातून नदीपात्रात झेपावणाऱ्या या पक्ष्यांना आपण प्राणाला मुकणार आहोत, याची कल्पनाही नसेल.
या प्रकाराची कुणकुण लागताच अऱ्हेरनवरगाव नदीपात्रात काल वनविभागाने अचानक धाड टाकली. या धाडीत १८४ जिवंत पक्षी तर काही मृत्यूमुखी पडलेले पक्षी आढळून आले. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी दामोधर रामा चंदीकार,विलास गोविंदा चंदेकार, अशोक नारायण मेश्राम यांना वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९६२ च्या कलम ९ नुसार अटक करुन जिवंत पाखरांना पुनश्च जंगलात सोडून जीवदान दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)
पाखरं विकणे सुरूच
वर्षानुवर्ष या पाखरांना पकडून त्याची विक्री केली जात आहे. हा प्रकार सातत्याने सुरू आहे. शहरातील बहुसंख्य मंडळी ही पाखरं विकत घेतात. यामध्ये आजपर्यंत हजारो पाखरे प्राणास मुकली आहेत. आज वनविभागाने याविरोधात कारवाई केली. अशी कारवाई सातत्याने होणे गरजेचे आहे. याशिवाय अन्य ठिकाणीसुद्धा पाखरे पकडली जात असून सर्रास विक्री केली जात आहे. त्याकडेही वनविभागाचे लक्ष असणे गरजेचे आहे.