राजुऱ्यात शेकडो शेतकरी रस्त्यावर
By Admin | Updated: September 23, 2016 01:03 IST2016-09-23T01:03:50+5:302016-09-23T01:03:50+5:30
धोपटाळा ओपन कास्टचे नवीन प्रोजेक्ट वेकोलि मार्फत करण्यात येत आहे.

राजुऱ्यात शेकडो शेतकरी रस्त्यावर
एक हजार शेतकऱ्यांवर अन्याय : सास्ती, धोपटाळा, भंडागपूर, कोलगाव, मानोलीचे शेतकरी
राजुरा : धोपटाळा ओपन कास्टचे नवीन प्रोजेक्ट वेकोलि मार्फत करण्यात येत आहे. त्यात सास्ती, धोपटाळा, भंडागपूर, कोलगाव, मानोली या क्षेत्रातील जमिनीवर सेक्शन ९ लागून दीड वर्षांच्यावर कालावधी होवून लोटला. मात्र सदर प्रकरणात भूमी अधिग्रहण संबंधी कसलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना हालअपेष्टा सहन करावे लागत असल्याने शेकडो शेतकरी गुरूवारी रस्त्यावर उतरून रोष व्यक्त केला.
या भागातील जवळपास १ हजार ८० सुशिक्षित बेरोजगारांचे भविष्य अंधारात आहे. प्रकल्प्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे लग्न तसेच त्यांचे आरोग्य हे वेकोलिच्या प्रचंड प्रदूषणाने धोक्यात आले आहे. मागील कित्येक वर्षांपासून येथील शेतकरी जलसिंचनाच्या तसेच वेकोलिच्या प्रदूषणामुळे त्रस्त आहेत. शेतीवर शेतीसाठी कर्जही देण्यात बँका नकार देत आहे. त्यामुळे बिकट परिस्थिती येथील गरीब शेतकऱ्यांवर आली आहे.
३१ डिसेंबर पर्यंत शेती अधिग्रहीत करून मोबदला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना द्यावा, अथवा सर्व प्रकारचे सेक्शन रद्द करून कोळसा खाणीचे प्रदूषण थांबवून नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा १ जानेवारी २०१७ ला तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रकल्पग्रस्त शेतकरी विजय चन्ने, वासुदेव बुटले, देवराव चन्ने, भाऊराव चन्ने, सतीश बानकर, बाळू जुलमे, विलास घटे, मोहनदास पेरखंडे, प्रमोद लांडे, संदीप खोपणे आदी शेतकऱ्यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)