कोरोना उपचारावरील खर्चाने शेकडो कुटुंब कर्जाच्या विळख्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:19 IST2021-07-08T04:19:13+5:302021-07-08T04:19:13+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अत्यंत भयानक होती. या लाटेमुळे बाधित होणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली. खासगी कोविड ...

कोरोना उपचारावरील खर्चाने शेकडो कुटुंब कर्जाच्या विळख्यात
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अत्यंत भयानक होती. या लाटेमुळे बाधित होणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली. खासगी कोविड रुग्णालयात रुग्णांना जागाच मिळत नव्हती. जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णालये कोविडसाठी अधिग्रहित करूनही त्या बेडसाठी धावाधाव करावी लागली. त्यातही खासगी कोविड रुग्णालयात दाखल होण्यासाठी बहुतांश डॉक्टर रुग्णांकडून ५० ते ६० हजार रुपये भरण्याचा तगादा लावत होते. त्यानंतर उपचाराच्या नावाखाली कालावधी वाढविला जात हाेता. परिणामी, रुग्णालयांचे चार्जेस वाढले. कोरोना संसर्गाचा तीव्र वेग असताना ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर आणि अन्य औषधींचाही चंद्रपुरात तुटवडा होता. प्रशासनाने काही दिवसानंतर त्यावर नियंत्रण आणले. पण, तोपर्यंत रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी वाटेल ती किमत मोजून रुग्णांचे नातेवाईक औषधी विकत घेत होते. यातूनही उपचाराचा खर्च आवाक्याच्या बाहेर गेला. चंद्रपुरातील काही खासगी कोविड रुग्णालयांनी तर एक लाखापेक्षाही जास्त शुल्क आकारले. या महामारीच्या संकट काळात प्रत्येक व्यक्ती आपला जीव वाचविण्याच्या प्रयत्नांत असताना सर्वसामान्य व गरीब रुग्णांच्या कुटुंंबांना पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याचे दिसून आले. पैशांची वेळेवर जुळवाजुळव न झाल्याने काही रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटनाही चंद्रपूर जिल्ह्यात घडल्या आहेत. नोकरदार व व्यावसायिक कुटुंबाची पार्श्वभूमी असणाऱ्यांना अथवा बँकेतील खात्यातील पैसे व विमा असलेल्या रुग्णांना अशा प्रकारचा त्रास झाला नाही; परंतु, अशी कोणतीही तरतूद नसलेल्या कोविड रुग्णांच्या कुटुंबांचे मोठे हाल झाले. कोरोनावर उपचार करण्यासाठी लागणारी रक्कम जमविण्यास नातेवाईकांकडे हात पसरावे लागले. शेवटी कुठेच मदत मिळत नसल्याचे पाहून काहींना खासगी कर्ज काढले. अनेकांनी उसने करून उपचाराचा खर्च भागविला. आता असे शेकडो कुटुंबांना आपल्या गरजांना कात्री लावून लोकांची देणी फेडण्यासाठी आटापिटा करत आहेत.
बॉक्स
शेतकरी कुटुंबांचे सर्वाधिक हाल
काही शासकीय व खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी भविष्य निर्वाह निधीतील रक्कम काढून कोरोना आजाराच्या उपचारावर खर्च केला. मात्र, सर्वाधिक हाल झाले कोरोनाग्रस्त शेतकरी कुटुंबांचे. खरीप हंगाम तोंडावर असताना ही आपत्ती आल्याने त्यांच्याकडील जमापुंजी संपली. शासकीय कोविड रुग्णालयात मोफत उपचार केले जाते. पण, कोरोना उद्रेकाच्या काळात बऱ्याच रुग्णांना ऑक्सिजन बेड्स मिळाले नाही. त्यामुळे खासगी उपचार करावे लागले. मूल, चिमूर, वरोरा, भद्रावती व राजुरा तालुक्यातील काही अल्पभूधारक कुटुंबांनी शेतीच्या जमिनी एक वर्षासाठी दुसऱ्यांकडे गहाण ठेवल्याचे समजते.
बॉक्स
पीएफ विड्राॅलसाठी नऊ जणांनी केला अर्ज
कोरोना उपचारासाठी पैशांची जुळवाजुळव करताना बऱ्याच कुटुंबांच्या डोक्यावर कर्ज चढले. त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी आता धावाधाव सुरू आहे. शासकीय व खासगी कंपनीत सेवारत कोरोनामुक्त झालेल्या चंद्रपुरातील नऊ जणांनी अखेरचा पर्याय म्हणून पीएफ विड्राॅल करण्यासाठी अर्ज सादर केल्याची माहिती आहे.