हूमन सिंचन प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 06:00 IST2020-01-17T06:00:00+5:302020-01-17T06:00:22+5:30
भादुर्णी येथील पुलाच्या बांधकामासाठी २२ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. या परिसरातील नागरिकांना कृषी विषयक संशोधन व प्रशिक्षणासाठी मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर केले. सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरणाऱ्या हूमन सिंचन प्रकल्पासंदर्भात आपण प्रयत्नशील असून लवकरच या विषयासंदर्भात योग्य तोडगा निघेल, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

हूमन सिंचन प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : मूल तालुक्याच्या ग्रामीण भागाच्या विकासासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. भादुर्णी या गावातील अंतर्गत विकासकामांसाठी दोन कोटी रूपयांचा निधी उपलब्ध केला असून उसराळा तसेच उसराळा चक या गावांसाठी दोन कोटी ५० लाख रू. निधी मी मंजूर केला. भादुर्णी येथील पुलाच्या बांधकामासाठी २२ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. या परिसरातील नागरिकांना कृषी विषयक संशोधन व प्रशिक्षणासाठी मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर केले. सिंचनाच्या दृष्टीने वरदान ठरणाऱ्या हूमन सिंचन प्रकल्पासंदर्भात आपण प्रयत्नशील असून लवकरच या विषयासंदर्भात योग्य तोडगा निघेल, असे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
मूल तालुक्यातील भादुर्णी या गावात आयोजित तालुकास्तरीय क्रीडा संमेलनाच्या उदघाटन समारंभात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, माजी सभापती पूजा डोहणे, उपसभापती घनश्याम जुमनाके, सविता सुनिल शेंडे, संवर्ग विकास अधिकारी कलोडे, भादुर्णीच्या सरपंच दीपिका शेंडे, उसराळाचे सरपंच बंडू नरमलवार, भादुर्णीचे उपसरपंच संतोष रेगुंडावार, उसराळाचे उपसरपंच तुषार ढोले, ग्राम पंचायत सदस्य चंद्रकला तोडासे, शुभांगी बोरूले, सविता शेंडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, २०२२ मध्ये भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील. तेव्हा आपल्या क्रांतीकारकांना समाधान वाटेल, असे काम करावे. मानव हा समाजशील प्राणी आहे असे म्हटले जायचे. आज मानव स्वार्थी प्राणी झाला आहे. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून काम करण्याची आवश्यकता आहे. क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून ऐक्याचे दर्शन घडण्याची आवश्यकता आहे. महिला सशक्तीकरणावर व स्वावलंबनावर भर देत त्यांच्यात आत्मविश्वास जागविण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.