वनविभागाच्या निवासस्थानांना घरघर
By Admin | Updated: July 13, 2017 00:37 IST2017-07-13T00:37:40+5:302017-07-13T00:37:40+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात जंगलासोबतच मोठ्या प्रमाणावर वन्यजीव आहेत. वन्यजीव व जंगलाचे समतोल राखण्याच्या दृष्टीने शेकडो वनकर्मचारी मूल तालुक्यात कार्यरत आहेत.

वनविभागाच्या निवासस्थानांना घरघर
मूलमधील कर्मचाऱ्यांची अडचण : बफरझोनच्या निवासस्थानात नॉन बफर झोनचे कर्मचारी
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : चंद्रपूर जिल्ह्यात जंगलासोबतच मोठ्या प्रमाणावर वन्यजीव आहेत. वन्यजीव व जंगलाचे समतोल राखण्याच्या दृष्टीने शेकडो वनकर्मचारी मूल तालुक्यात कार्यरत आहेत. वनकर्मचाऱ्यांना जंगलाचे रक्षण करणे सोपे जावे यासाठी मूल येथील वनविभाग कार्यालय परिसरात कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. मात्र या वसाहतीतील अनेक निवासस्थाने पडक्या स्थितीत आहेत. ते दुरुस्त करण्याचे सौजन्य वनविभाग दाखवित नसल्याने कर्मचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
येथील वनविभागाचे कार्यालय चिचपल्ली वनविभागाशी जोडण्यात आलेले आहे आणि मूल वनविभाग हे अंधारी व्याघ्र प्रकल्पाशी जोडण्यात आलेले आहे. अंधारी व्याघ्र प्रकल्पाशी जोडण्याआधीच मूल येथील वनविभागाच्या वसाहतीमधील निवासस्थाने पडक्या अवस्थेत होते. असे असतानाही एक ते दोन वनकर्मचारी निवासस्थानाचा आसरा घेत आहे. परंतु सुव्यवस्थीत असलेल्या निवासस्थानात मूल येथील नॉनबफर वनविभागातील वनरक्षक शिवरकर राहतात.
मूल वनपरिक्षेत्र (बफर) मध्ये ६ निवासस्थाने राहण्यायोग्य आहेत. त्यामध्ये ३ बफरझोन क्षेत्रातील तर २ नॉनबफर क्षेत्रातील कर्मचारी वास्तव्य करीत आहे. तर एकाची बदली झालेली आहे. मूल वनपरिक्षेत्र (बफर)चे वनपरिक्षेत्राधिकारी म्हणून एस.जे. बोबडे कार्यरत आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी बोबडे हे त्यांच्या निवासस्थानामध्ये तर क्षेत्र सहायक तावाडे हे एका निवासस्थानात राहतात. तर नॉनबफर वनविभागातील मूलचे क्षेत्र सहाय्यक एस.एम. बालपने राहतात.
वनरक्षकाच्या निवासस्थानामध्ये नॉनबफर वनविभागाचे वनरक्षक शिवरकर, बफरझोन वनविभागाचे वनरक्षक महेश म्हस्के राहतात.
येथील वनविभागाच्या वसाहतीत सहा पेक्षा जास्त निवासस्थाने आहेत. परंतु ते पडक्या अवस्थेत असल्यामुळे त्यांचा उपयोग वनकर्मचाऱ्यांना करता येत नाही. नादुरुस्त निवासस्थानांची दुरुस्ती होत नसल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना खाजगी घरांचा आसरा घ्यावा लागत, आहे हे विशेष!