घराघरांत लागली पक्षिघागर

By Admin | Updated: April 18, 2015 01:15 IST2015-04-18T01:15:50+5:302015-04-18T01:15:50+5:30

दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यामुळे संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात आली आहे.

In the house, the birds gathered in the park | घराघरांत लागली पक्षिघागर

घराघरांत लागली पक्षिघागर

शंकरपूर: दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. यामुळे संपूर्ण सजीव सृष्टी धोक्यात आली आहे. या परिणामावर मात करण्यासाठी मानव आपल्या बुद्धीच्या जोरावर विविध उपाययोजना करीत आहे. परंतु यात पशुपक्ष्यांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला असतानाच चिमूर तालुक्यातील शंकरपूर येथील तरूण पर्यावरणवादी मंडळाने घरोघरी पक्षी घागर लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
उन्हाच्या तडाख्यात पक्ष्यांना तहान भागविणे कठीण जात आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो पक्षी तहानेने व्याकूळ होऊन मृत्यूमुखी पडत आहेत. या पक्ष्यांना पाणी मिळावे, यासाठी शंकरपूर येथील तरुण पर्यावरणवादी मंडळाने मागील १२ वर्षापासून ‘पक्षी घागर’ ही संकल्पना घराघरांत पोहचविली आहे.
तिव्र उन्हामुळे शेतशिवारातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत कोरडे झाले आहेत. त्यामुळे पशुपक्ष्यांना जीवदान देण्यासाठी तरुण पर्यावरणवादी मंडळाचे युवक सरसावले आहेत. गाव शिवारात ‘झाड तेथे पक्षीघागर’ ही मोहीम या मंडळाने कार्यान्वित केली आहे. मंडळाचे सदस्य शक्यतोवर जास्तीत जास्त घागरीत दररोज सकाळी पाणी साठवून पाखरांची तहान भागविण्याचे काम करीत आहेत. गावातील ज्या नागरिकांच्या अंगणात झाडे आहेत, तेथे पक्षी घागर बांधण्यात येत आहे. यासोबतच जनजागृती म्हणून फेसबुकवर मॅसेज, व्हॉटस्अ‍ॅपवर संदेश तयार केला असून चौका-चौकात पक्षी बचाव, पक्षांना पाणी पाजूया या आशयाची फलके लावून जनतेचे लक्ष वेधले आहेत.
यावर्षी मंडळाने ५०० पक्षी घागर तयार केल्या असून परिसरात व गावातील लोकांना त्याचे वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमाला लागणारा आर्थिक निधी तरुण पर्यावरणवादी मंडळ वनविभाग ब्रह्मपुरी व चिमूर व शंकरपूर यांनी गोळा केला आहे. या उपक्रमात मंडळाचे सदस्य अमोद गौरकर, विरेंद्र हिंगे, मोरेश्वर पांगुळ, पवन राहुड, विजय गजभे, राहुल शेंडे, गारघाटे, संतोष कोरडे, वैभव हजारे, योगेश पचारे, महेश शिवरकर, सतीश भजभुजे, जगदीश पेंदाम, सोनु बावणकर, अमित शिवरकर, अमर दडवे, निरजंन शिवरकर, मेजर कासवटे, शुभम शिवरकर हे सर्व या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहेत. (वार्ताहर)

Web Title: In the house, the birds gathered in the park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.