घोडाझरी नहर फुटला
By Admin | Updated: October 11, 2015 02:12 IST2015-10-11T02:12:45+5:302015-10-11T02:12:45+5:30
घोडाझरी सिंचाई तलावावर अवलंबून असलेल्या हजारो हेक्टर जमिनीवरील धानपिक कालवा फुटला.

घोडाझरी नहर फुटला
शेतकरी संकटात : नवरगाव परिसरातील धान पीक धोक्यात
नवरगाव : घोडाझरी सिंचाई तलावावर अवलंबून असलेल्या हजारो हेक्टर जमिनीवरील धानपिक कालवा फुटला. त्यामुळे शेतकऱ्यांचे धानपिक धोक्यात आले आहे. कालव्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नवरगाव परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
नवरगाव परिसरातील हजारो हेक्टर शेत जमीन ही घोडाझरी तलावाच्या पाण्यावर अवलंबून आहे. परिसरातील धान हे मुख्य पिक आहे. यावर्षी परिसरात पाऊस कमी झाल्याने घोडाझरी तलावात पाणीसाठासुद्धा कमी होता. कमी पाण्यावर नियोजन करून संबंधित अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांपूर्वी नहर (कालवा) सोडला. शेवटपर्यंत पाणी पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच अचानक नहर फुटला आणि पाणी वाया गेले. त्यामुळे नहर बंद करून युद्ध पातळीवर जेसीबीच्या साहाय्याने तात्काळ बांधकाम दुरुस्ती करण्यात आली व पुन्हा नहर सोडण्यात आला. परंतु पुन्हा नहर फुटल्याने धानपिक धोक्यात आले आहे. मागील पाच-सात दिवसांपासून नवरगावकडे येणाऱ्या नहराचे पाणी बंद आहे.
या परिसरात पाण्याचे विशेष साधन नसल्याने घोडाझरीवरच शेतकरी अवलंबून आहेत. मागील २२ दिवसांपासून या परिसरात पाऊस न झाल्याने शेतातील धान पिक संकटात सापडले आहे. पाण्यामुळे धान पिक धोक्यात आले असतानाच करपा, गादमाशी, तुडतुडा अशा रोगांनीही धानावर अतिक्रमण केले असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे घोडाझरी सिंचाई विभागाने घोडाझरी नहर लवकर सोडावा, अशी मागणी आहे. (वार्ताहर)