घोडाझरी अद्यापही कोरडाच
By Admin | Updated: August 22, 2015 01:25 IST2015-08-22T01:25:28+5:302015-08-22T01:25:28+5:30
पुर्व विदर्भात पर्यटकांचे आकर्षण ठरलेला नागभीड तालुक्यातील घोडाझरी प्रकल्प आॅगस्ट महिना संपायला आला तरी कोरडाच दिसत आहे.

घोडाझरी अद्यापही कोरडाच
जोरदार पावसाची गरज : पावसाळी पर्यटकांचा हिरमोड
घनश्याम नवघडे नागभीड
पुर्व विदर्भात पर्यटकांचे आकर्षण ठरलेला नागभीड तालुक्यातील घोडाझरी प्रकल्प आॅगस्ट महिना संपायला आला तरी कोरडाच दिसत आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटकांचा चांगलाच हिरमोड होत आहे.
या भागातील शेतकऱ्यांची सिंचनाची सोय व्हावी, या उद्देशाने इंग्रजांनी १९०५ मध्ये या तलावाची निर्मिती केली. आज या तलावापासून सिंदेवाही आणि नागभीड तालुक्यातील १५ हजार एकर शेतीला सिंचन होत आहे. सिंचनासोबतच या तलावाचा पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असून पुर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील पर्यटक या तलावाला नेहमीच भेट देत असतात.
खरेतर पावसाळ्यात घोडाझरीला भेट देण्याची मजा काही औरच असते. तलाव ओव्हरफ्लो झाला की, सांडव्यावरुन फेसाळलेले ओसंडून वाहणारे धबधबे, समोर तुडूंब निळेशार जलाशय, तिन्ही बाजूला नैसर्गिक टेकड्या आणि या टेकड्यावरची हिरवी गर्द वनराई हे नैसर्गिक सौंदर्य डोळ्यात साठविण्यासाठी आणि त्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक रोजच या ठिकाणी हजेरी लावत असतात. याशिवाय पंचक्रोशीत वास्तव्यास असणारे शेकडो पर्यटक अगदी रोजच या ठिकाणी सामूहिक वनभोजनाचे आयोजन करीत असतात.
असे असले तरी यावर्षी मात्र निसर्गाने पाठ फिरविल्याने म्हणावा तेवढा पाऊस या भागात झालाच नाही. परिणामी घोडाझरी तलाव भरलाच नाही. तलावच भरला नसल्याने पर्यटकांचा चांगलाच हिरमोड होत आहे. नाही म्हणायला पर्यटक अगदी बाराही महिने येथे भेट देत असतात. त्याप्रमाणे येथे पर्यटकांची वर्दळ सुरूच आहे.
घोडाझरी पर्यटनस्थळाच्या व्यवस्थापनाने या ठिकाणी बालोद्यान, बोटींगची व्यवस्था केली आहे.
इंग्रजानी १०९५ मध्ये बांधलेली निरीक्षणकुटी आणि तेलीफुलांनी बहरलेला बगीचा याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येथे येतच आहेत. पण जी मजा तलाव ओव्हर फ्लो झाल्यानंतर पर्यटक लुटत असतात. त्या मजेपासून आज तरी पर्यटक पारखे झाले आहेत. केव्हा मोठा पाऊस येतो आणि तलाव ओव्हरफ्लो असे पावसाळी पर्यटकांना झाले आहे. त्यासाठी जोरदार पावसाची गरज निश्चितच आहे.