चंद्रपुरातील चौकात होर्डिंग्जची गर्दी !
By Admin | Updated: December 28, 2015 01:22 IST2015-12-28T01:22:29+5:302015-12-28T01:22:29+5:30
मागील काही दिवसांपासून चंद्रपुरातील चौक होर्डिंग्जने बरबटल्याचे दिसून येत आहे.

चंद्रपुरातील चौकात होर्डिंग्जची गर्दी !
चौकाचे सौंदर्यीकरण बाधित : मुदत संपल्यावरही होर्डिंग्ज कायम
चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपुरातील चौक होर्डिंग्जने बरबटल्याचे दिसून येत आहे. यातील काही होर्डिंग्ज तर विना परवानगीने लावण्यात येतात. कधी मुदत संपूनही होर्डिंग्ज काढले जात नाही. त्यामुळे चौकातील सौंदर्यच नष्ट होत आहे.
कुणाचा वाढदिवस असो, कोणत्या कार्यक्रमाचे आयोजन असो, राजकीय पक्षांचे मेळावे असो वा राजकीय नेत्यांचे आगमन, शहरातील चौकाचौकात होर्डिंग्ज लावून जाहिराती करण्याचे चंद्रपुरात जणू फॅडच निघाले आहे. अलिकडच्या काही दिवसात तर विशिष्ट सणाला शुभेच्छा देण्यासाठी मोठमोठे होर्डिंग्ज लावण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या चंद्रपुरात जटपुरा चौक, गिरनार चौक, प्रियदर्शिनी चौक, जनता कॉलेज चौक, छोटा बाजार, महात्मा गांधी मार्ग, जयंत टॉकीज चौक, बंगाली कॅम्प चौक, नागपूर मार्ग, सीटी पोस्ट आॅफीस चौक यासह अनेक चौकात होर्डिंग्ज लावण्यात आले आहे. काही होर्डिंग्ज तर चक्क रस्त्यावर आलेले आहेत.
याशिवाय अनेकजण होर्डिंग्ज लावताना मनपाची रितसर परवानगी घेत नाही. काही जण परवानगी घेतात, पण मुदतीनंतरही होर्डिंग्ज लावलेलेच असतात. याबाबत मनपाने कोणतेही पाऊल उचलले नाही. त्यामुळे होर्डिंग्ज लावणाऱ्यांचे फावत होते. मात्र काही महिन्यांपूर्वी मनपा प्रशासन यासंदर्भात गंभीर झाले होते. मनपाने अनधिकृत होर्डिंग्जविरुध्द मोहीम सुरू केली. अनेक होर्डिंग्ज काढले. त्यानंतर ही मोहीम बंद करण्यात आली. त्यामुळे पुन्हा चंद्रपुरातील चौकाचौकात होर्डिंग्ज बाजार लागलेला दिसत आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे झाले आहे. (शहर प्रतिनिधी)
निविदेची प्रकियाही रखडली
कर्मचाऱ्यांचा अभावामुळे शहरातील प्रत्येक चौकात लावलेल्या होर्डिंग्जची मुदत तपासणे, परवानगी तपासणे आदी बाबी शक्य होत नसल्याने याचे टेंडर काढून खासगीकरण करण्याचा निर्णय मनपाने घेतला होता. प्रकाश बोखड हे आयुक्त असताना टेंडरही काढण्यात आले होते. मात्र ही प्रक्रिया पुढे सरकलीच नाही. त्यामुळे कुणालाही याचे टेंडर देण्यात आले नाही.
होर्डिंग्जला मर्यादा असावी
चौकाचे सौंदयीकरण अबाधित रहावे व वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी चौकाचौकात लावण्यात येणाऱ्या होर्डिंग्जला मर्यादा असणे आवश्यक आहे. कोणत्या चौकात किती होर्डिंग्जला परवानगी द्यायची याचेही मनपा प्रशासनाने नियम तयार करावे. तरच या अमर्याद होर्डिंग्जबाजीवर आळा बसू शकेल.