कापूस उत्पादक शेतकऱ्यांची भाववाढीची आशा मावळली
By Admin | Updated: December 27, 2015 01:26 IST2015-12-27T01:26:35+5:302015-12-27T01:26:35+5:30
नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचे नुकतेच सूप वाजले. यात विदर्भातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कापूस व धानाला वाढीव भाव मिळेल, ....

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची भाववाढीची आशा मावळली
अधिवेशन संपले : कापसाच्या भावाला उतरती कळा
नांदाफाटा : नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचे नुकतेच सूप वाजले. यात विदर्भातील प्रमुख नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या कापूस व धानाला वाढीव भाव मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र अधिवेशन संपूनही कापूस व धानाचे भाव मात्र समाधानकारक वाढल्याचे दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत निराशा पसरली आहे.
कापसाला सहा हजार व धानाला चार हजार रुपये भाव मिळावा, यासाठी यापूर्वी विरोधी पक्षात असताना मुख्यमंत्र्यांनी आंदोलने केली. देशाच्या पंतप्रधानांनीही ५० टक्के नफा अधिक उत्पादन खर्च भरून निघेल इतका हमी भाव देण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिले. परंतु अधिवेशनात कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांबाबत काहीच निर्णय न घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
कृषी विद्यापीठाच्या परीक्षण अहवालानुसार कापसाला साधरणत: सहा हजार ८०० व धानाला पाच हजार रुपये भाव देण्याची शिफारस करण्यात आली आहे. यातच खते व बियाण्यांच्या वाढत्या किंमतीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याचे दिसते. यावर्षी कापसाला ४ हजार १०० हमीभाव जाहीर करण्यात आला. गरजेपोटी मोठ्या प्रमाणात पीक घेणाऱ्या कोरपना, जिवती, राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अर्धाधिक कापूस लगतच्या यवतमाळ, आदिलाबाद जिल्ह्यात विक्री केला आहे. वाहतूक खर्च व मजुरांची मजुरी बघता मोठा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. त्यामुळे कापूस व धान उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. काही दिवसाआधी कापसाच्या भावात २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली. बाजारात ४ हजार ४०० रुपयांपर्यंत कापसाची खरेदी करण्यात आली. परंतु दोन दिवसांतच चित्र पालटले आणि आता कापसाला चार हजार रुपयात विक्री करावी लागत आहे. यातच शासनाची अनेक केंद्रावरील खरेदीही बंद असल्याचे दिसते. नगदी पीक म्हणून समजल्या जाणाऱ्या कापूस व धान उत्पादक शेतकऱ्यांना कवडीमोल भावात पिकाची विक्री करावी लागत आहे. एकीकडे शासन शेतकऱ्यांना अनेक योजनांची खिरापत वाटप करीत असले तरी दुसरीकडे उत्पादित केलेल्या मालाला भाव मिळत नसल्याचे वास्तव आहे. (वार्ताहर)