हिरापूर येथे घरकूल घोटाळा
By Admin | Updated: December 2, 2015 00:56 IST2015-12-02T00:56:26+5:302015-12-02T00:56:26+5:30
प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून विविध योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करवून घेतली जात आहे.

हिरापूर येथे घरकूल घोटाळा
कारवाईची मागणी : बांधकाम न करता लाखो रुपयांची उचल
आंबोली : प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून विविध योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करवून घेतली जात आहे. मात्र असे असतानाही ग्रामपंचायत स्तरावर नियोजन अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांनी घरकुल बांधकामात गैरव्यवहार केल्याचा प्रकार आंबोलीपासून सात किमी अंतरावर असलेल्या हिरापूर येथे घडला आहे. माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीतून हा प्रकार उजेडात आला.
हिरापूर येथील २३ कुटूंबांना सन २०११-१२ ते सन २०१२-१३ या वर्षात शासनाच्या सामाजिक न्याय व नवबौद्ध घटक योजनेअंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले. मंजूर घरकुलाचे बांधकाम पंचायत समिती चिमूर व ग्रामपंचायतच्या देखरेखीत करण्यात येते. काही घरकुल लाभार्थ्यांना आबादी जागेतील प्लॉट देण्यात आले काहींना स्वत:ची जागा आहे तर काही लाभार्थ्यांनी झुडपी जंगल नमूद असलेल्या जागेवर अतिक्रमण केले. या जागेवर २३ घरकूल लाभार्थ्यांपैकी १२ लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम केलेले नाही. प्रत्येक लाभार्थ्यांना मिळालेल्या घरकुलाचा धनादेश ६९ हजार ३०४ रुपये याप्रमाणे प्रत्येकी १२ घरकुल लाभार्थ्यांना घरकुलाचे बांधकाम न करता रक्कम देण्यात आली. तसेच झुडपी जंगल गवत महाराष्ट्र शासन वनविभाग असे नमूद असलेला सातबारा भु.क्र. २५४ आराजी १०.७६ हे.आर. नोंद असलेल्या या झुडपी जंगल जागेवर आठ लाभार्थ्यांनी अतिक्रमण करून घरकुलाचे बांधकाम केले आहे.
या गैरप्रकरणाची तक्रार संवर्ग विकास अधिकारी चिमूर यांच्याकडे यापूर्वी करण्यात आली. पण अजूनपर्यंत साधी चौकशीही करण्यात आलेली नाही. येथील नाजूक अर्जून वाकडे हे पुणे येथे नोकरी करीत आहेत. त्यांनाही घरकुल मंजूर झाले. मात्र बांधकाम न करता ६९ हजार ३०४ रुपये असा निधी उचलण्यात आल्याचे दिसून येत आहे. तर शेवंता बापूराव वाघमारे ही मयत असून तिच्या नावे २५ हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला. बांधकाम मात्र अजुनही झाले नाही.
शामराव फागो नागदेवते, बाळा भदू वाकडे, प्रभू वाकडे, बंडू विठोबा वाकडे, वामन किसन डांगे, भाष्कर नामदेव धनविजय, बालकदास गुलाब वाघ, बापुराव महादेव वाकडे, अनिल शंकर मुनघाटे, सदाशिव गोदरू वाकडे या लाभार्थ्यांनी प्रत्येकी ६९ हजार ३०४ रुपयाचे धनादेश घेवून शासनाची फसवणूक केली.
घरकुल योजना १०० रुपयाच्या मुद्रांक शुल्कावर शपथपत्र तयार करून त्यात स्वत:ची जागा, घर टॅक्स पावती कर आकारणी हे सर्व पुरावे जोडून शपथपत्र तयार करू दिल्या जाते. त्या करारनाम्यावर सरपंच, लाभार्थी व साक्षदारांच्या स्वाक्षऱ्या घेवून त्या आधारावर घरकूल निधी दिला जातो. परंतु, हिरापूर येथे एकूण २३ लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकामात आठ लाख ७३ हजार ४० रुपये एवढ्या रुपयाचा गैरप्रकार झाला आहे. (वार्ताहर)