‘मोबाईल टू मोबाईल’ दारूची होम डिलिव्हरी
By Admin | Updated: January 21, 2016 01:01 IST2016-01-21T01:01:59+5:302016-01-21T01:01:59+5:30
चंद्रपूर जिल्हा दारूबंदी होऊन जवळजवळ एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र आजही अनेक ठिकाणी अवैधरित्या मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूची खुलेआम विक्री सुरू आहे, ...

‘मोबाईल टू मोबाईल’ दारूची होम डिलिव्हरी
पोलिसांचे दुर्लक्ष : जिवती तालुक्यात तेलंगणा राज्याची दारू
संघरक्षित तावाडे जिवती
चंद्रपूर जिल्हा दारूबंदी होऊन जवळजवळ एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र आजही अनेक ठिकाणी अवैधरित्या मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूची खुलेआम विक्री सुरू आहे, हे सत्य नाकारता येत नाही. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुका तेलंगणा राज्याला लागूण असल्याने जिवती तालुक्यात तेलंगणाच्या दारूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे, ‘मोबाईल टू मोबाईल’ दारूची होम डिलिव्हरी होत असल्याचा प्रकार तालुक्यात सुरू आहे.
भर चौकात किराणा दुकाण असो, हॉटेल किंवा पानटपरी असो, या ठिकाणी तेलंगणा राज्याची दारू दुप्पटीने विकताना पहायला मिळते. एखादा मद्यशौकीन ‘महाराष्ट्र की है क्या’ अशी विचारपूस केली तर ‘तेलंगणा की है, पिणा है लो, नही तो रहणे दो’ असे बोलल्या जाते. सीमेवरील परमडोली ताडा, नोकेवाडा, शेणगाव, झानेरी तसेच तालुक्याचे ठिकाण असलेल्या जिवती शहरात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री सुरु आहे.
हे सर्व उघड असतानाही येथील पोलीस प्रशासन गप्प का, हा विचार करण्याचा प्रश्न आहे. तालुक्याला तेलंगणा राज्याची सीमा लागून असल्याने विक्रेत्यांना येथून दारू आणणे सोईस्कर झाले आहे. येथे होलसेल दारूची विक्री होत असून पिणाऱ्यांकडून दुप्पट किंमत वसुल केली जात आहे. मजूर वर्ग दिवसभर केलेल्या रोजंदारीचे पैसे दारू विक्रेत्याच्या घशात घालतात व आपली तहाण भागवतात, अशा प्रतिक्रिया महिला वर्गाकडून ऐकायला मिळत आहेत. अवैध दारूने आमचे संसार मोडकळीस आले असून विकणारे पैसा कमवित आहेत.
यामुळे दारूबंदीचा काय फायदा, असा प्रश्न महिला वर्ग उपस्थित करीत आहेत.
सिंगम पोलिसवाला गेला कुठे?
जिवती पोलीस स्टेशनमध्ये के. बी. शेळके हे दोन-तीन महिन्यापूर्वी ठाणेदार म्हणून रुजू झाले. आल्याआल्या त्यांनी तालुक्यात सिंगम स्टाईल कडक रुबाब दाखविला. अवैध धंद्यावर आळा बसविने आणि तालुक्यात शांतता, सुव्यवस्था कशी नांदेल यावर त्यांचा भर होता. वेळप्रसंगी वाईट वागणाऱ्यांच्या कानावर दोन वाजवायलाही मागे पुढे पाहत नव्हते. हे सर्व पाहुन जनताही खूष होती. पण सध्या तालुक्यात अवैध दारू विक्री खुलेआम पाहता त्यांच्यातला सिंगम नावाचा कडक गुण कमी दिसतो आहे.
नाकाबंदी करणे गरजेचे
संपूर्ण जिवती तालुक्यात तेलंगणाची दारू येत असून यावर आळा घालने कठीण नाही. जिवतीवरुन तेलंगणात जाण्यासाठी जे मार्ग आहेत, त्या रस्त्यांवर सीमेला लागून पोलीस चौकी लावून नाकाबंदी केल्यास दारू तस्करीवर आळा बसू शकते. परमडोली, येलापूर, लेंडीगुडा व भारी येथून तेलंगणात जाण्यासाठी मुख्य मार्ग आहेत. याच रस्त्याने दारू पार्सल होते. पण या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नसल्याने हे सर्व खुलेआम घडत आहे.