बेरोजगार पदवीधरांनी पेटविली पदव्यांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:17 IST2018-03-02T00:17:59+5:302018-03-02T00:17:59+5:30
केंद्र व राज्य सरकार बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्वासन पाळत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी राजुरा व ब्रह्मपुरी येथे युवकांनी आपल्या पदव्याच्या सत्यप्रती जाळून आपला निषेध नोंदविला.

बेरोजगार पदवीधरांनी पेटविली पदव्यांची होळी
ऑनलाईन लोकमत
राजुरा/ ब्रह्मपुरी : केंद्र व राज्य सरकार बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्वासन पाळत नसल्याच्या निषेधार्थ गुरुवारी राजुरा व ब्रह्मपुरी येथे युवकांनी आपल्या पदव्याच्या सत्यप्रती जाळून आपला निषेध नोंदविला. यावेळी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणा देऊन वेगळा विदर्भ होण्याची मागणीही या युवकांनी केली. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा शाखेने हे डिग्री जलाओ आंदोलन केले.
गुरुवारी दुपारी १ वाजता राजुरा येथील पंचायत समिती चौकात मोठ्या संख्येने युवक व समितीचे कार्यकर्ते एकत्र आले. यावेळी बोलताना अनेक बेरोजगार इंजिनिअर व पदवीप्राप्त युवकांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या आणि आपल्या डिग्रीचा काहीही उपयोग होत नसून घरची जबाबदारी कशी पेलायची, असा यक्षप्रश्न असल्याचे सांगितले. या आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ज्येष्ठ नेते अॅड. वामनराव चटप, प्राचार्य अनिल ठाकूरवार, युवा आघाडीचे विदर्भ सचिव कपील इद्दे, मिलिंद गड्डमवार, बाजार समिती सभापती हरिदास बोरकुटे, युवा नेते जीवन तोगरे, प्रेम चव्हाण, अमोल चव्हाण, निखील बोंडे, नगरसेवक मधुकर चिंचोलकर, दिलीप देरकर आदी उपस्थित होते. ब्रह्मपुरी येथील शिवाजी चौकात बेरोजगार पदवीधारकांनी एकत्र येत पदव्यांच्या सत्यप्रतींची होळी पेटविली.