घोडपेठसह सहा गावात रंगमुक्त होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 00:21 IST2018-03-02T00:21:24+5:302018-03-02T00:21:24+5:30
पारंपरिक पध्दतीने होळी सणाचा आनंद घेणे सर्वांनाच आवडते. मात्र मागील काही वर्षांपासून होळी या सणाच्या निमित्ताने पर्यावरण व जल हे समाजाशी निगडीत प्रश्न समोर येत आहेत.

घोडपेठसह सहा गावात रंगमुक्त होळी
वतन लोणे ।
ऑनलाईन लोकमत
घोडपेठ : पारंपरिक पध्दतीने होळी सणाचा आनंद घेणे सर्वांनाच आवडते. मात्र मागील काही वर्षांपासून होळी या सणाच्या निमित्ताने पर्यावरण व जल हे समाजाशी निगडीत प्रश्न समोर येत आहेत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी भद्रावती तालुक्यातील गुरूदेव सेवा मंडळांनी एकत्र येत रंगमुक्त, व्यसनमुक्त व पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील तीन वर्षांपासून घोडपेठसह पाच गावात रंगमुक्त होळी साजरी करण्यात येत होती. यंदा आणखी एका गावाने या उपक्रमात सहभाग दर्शविला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा आदर्श ठेवत व ‘होळी करा व्यसनांची, उधळण करा प्रेमाची’ या ब्रिदवाक्याला समोर ठेवून भद्रावती तालुक्यातील घोडपेठ, चालबर्डी (रै.), लोणारा (पारखी), चपराळा, हेटी व बोर्डा (वरोरा) या सहा गावांतील गुरूदेव सेवा मंडळे एकत्र येवून आपापल्या गावात रंगमुक्त, व्यसनमुक्त व पर्यावरण पुरक अशी होळी साजरी करतात. ग्रामगीतेतील तत्वानुसार होळी म्हणजे ग्रामशुध्दीदिन आणी धुलिवंदन म्हणजे परस्परांतील मतभेद विसरून प्रेमभाव वाढीस लावणे. ग्रामगीतेमध्ये सांगितलेली ही मार्गदर्शक तत्वे लक्षात घेऊन होळी व धुलिवंदन या दिवशी पाचही गावांमध्ये त्या-त्या गावातील गुरूदेव सेवा मंडळामार्फत एकाचवेळी लोकोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. होळीच्या दिवशी ग्रामसफाई करून दिवसभरात जमा झालेल्या कचºयाची होळी करून ती जाळण्यात येणार आहे. या अग्निप्रकाशात गावातील नागरिक व्यसनमुक्तीचा संकल्प घेणार आहेत. परंपरेनुसार होलिका दहन करण्यासाठी लाकडांचा भरपूर वापर करण्यात येतो. यासाठी लाखो वृक्षांची कत्तल करण्यात येते. साहजिकच यामुळे पर्यावरणाचा ºहास होत आहे. मात्र, ग्रामसफाईच्या माध्यमातून जमा झालेल्या कचºयाची होळी केल्यास पर्यावरणाचे रक्षणही होईल; शिवाय गाव स्वच्छ व सुंदरही होईल. परिणामी, नागरिकांना प्रदूषणमुक्त व चांगल्या आरोग्याचा लाभ घेता येईल. परंपरेनुसार सायंकाळी घरात बनविलेल्या गोड-धोड पदार्थांचा नैवेद्य दाखवून हे अन्न होळीत समर्पित करण्यात येते. मात्र, यावेळी हे अन्न वाया जाऊ न देता एका ठिकाणी जमा करून गरजूंना वाटप करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
नागरिकांचे प्रबोधन
धुलिवंदनाच्या दिवशी पाण्याचा वापर न करता रंगमुक्त होळी साजरी करण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करण्याचे कार्य सहाही गावांमध्ये गुरूदेव भक्तांकडून सुरू आहे. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सवसुध्दा साजरा करण्यात येणार आहे. तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक रंगमुक्त, व्यसनमुक्त व पर्यावरणपूरक होळी या संकल्पनेवर आपले विचार नागरिकांसमोर ठेवणार आहेत.
अन् पर्यावरणपूरक होळीला प्रारंभ
तीन वर्षांपूर्वी भद्रावती तालुक्यातील चालबर्डी (रै.) येथे रंगमुक्त होळीच्या संकल्पनेला सुरूवात करण्यात आली. त्यावेळी गावातील ९० टक्के नागरिकांनी रंगांचा वापर न करता होळी साजरी करून ही संकल्पना प्रत्यक्षात यशस्वी करून दाखविली. ग्रामगीताप्रणित रंगमुक्त, व्यसनमुक्त व पर्यावरणपूरक होळी साजरी करून जास्तीत जास्त गावातील नागरिकांनी नवीन पायंडा घालावा, असे आवाहन गुरूदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.