तलाठ्यांचे पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
By Admin | Updated: April 21, 2016 01:12 IST2016-04-21T01:12:21+5:302016-04-21T01:12:21+5:30
पटवारी मंडळ अधिकाऱ्यांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून शासनस्तरावर अपूर्ण आहेत.

तलाठ्यांचे पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
चंद्रपूर : पटवारी मंडळ अधिकाऱ्यांच्या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून शासनस्तरावर अपूर्ण आहेत. त्यामुळे त्या मागण्याची पूर्तता करण्यासाठी विदर्भ पटवारी, मंडळ अधिकारी संघ, नागपूर जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी धरणे आंदोलन करण्यात आले. तसेच पटवरी भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील तिनशेच्या जवळपास पटवारी व ५२ मंडळ अधिकारी सहभागी झाले होते.
पटवारी मंडळ अधिकाऱ्यांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी ९ ते १६ फेब्रुवारी या काळात पटवाऱ्यांतर्फे लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एक महिन्याच्या आत मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, ते आश्वासन पुर्ण न झाल्यामुळे पटवारी मंडळाने १६ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांना स्मरण पत्र दिले. त्याचीही दखल जिल्हाधिकाऱ्यांनी न घेतल्याने ७ एप्रिलला २० एप्रिलपासून लेखणी बंद आंदोलन करण्याबाबतचे पत्र दिले. तरी सुद्धा या पत्राची दखल घेण्यात आली नाही.
त्यामुळे पटवारी संघटनेने बुधवारपासून लेखणीबंद आंदोलन सुरू करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन दिले. यावेळी विदर्भ पटवारी मंडळाचे अध्यक्ष अरूण झाडे, सचिव संपत कन्नाके, संघटक प्रशांत सुर्वे, मंडळ अधिकारी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप जुमडे, सचिव अनिरूद्ध पिंपळापुरे यांची उपस्थिती होती. मुख्य मार्गाने मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देण्यात आली. (नगर प्रतिनिधी)