ऐतिहासिक वारसा नव्याने झळाळणार
By Admin | Updated: February 22, 2015 00:57 IST2015-02-22T00:57:33+5:302015-02-22T00:57:33+5:30
चंद्रपूरच्या गतवैभवाची साक्ष पटविणाऱ्या आणि गोंडराजाचा इतिहास उभ्या करणाऱ्या चंद्रपूर शहरातील पुरातन वास्तू आणि स्मारकांना नवी झळाळी येण्याची सुचिन्हे दिसत आहेत.

ऐतिहासिक वारसा नव्याने झळाळणार
चंद्रपूर : चंद्रपूरच्या गतवैभवाची साक्ष पटविणाऱ्या आणि गोंडराजाचा इतिहास उभ्या करणाऱ्या चंद्रपूर शहरातील पुरातन वास्तू आणि स्मारकांना नवी झळाळी येण्याची सुचिन्हे दिसत आहेत. केंद्रीय रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या पुढाकारात शनिवारी चंद्रपुरात पुरातत्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत बऱ्याच विषयांवर चर्चा होऊन प्रस्ताव सादर झाल्याने चंद्रपूरच्या सौदर्यात नव्याने भर पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
स्थानिक विश्रामगृहावर पार पडलेल्या या बैठकीला पुरातत्व विभागाचे मुंबईतील क्षेत्रीय संचालक एम. महादेवय्या, औरंगाबाद येथील पुरातत्व अधिक्षक अलोणे, राज्य पुरातत्व अधिकारी बालपांडे यांच्यासह आमदार नाना श्यामकुळे, डॉ. संजय धोटे, महापौर राखी कंचलार्वार, जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरुनुले, जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, जी.पी.गरड, अशोकसिंग ठाकुर आदी उपस्थित होते. इंटरप्रिटीशन व कल्चरल सेंटर चंद्रपूर शहरात करण्यासाठीचा मास्टर प्लॉन पुरातत्व विभागाने तयार करावा, असे निर्देश ना.हंसराज अहिर यांनी पुरातत्व विभागाला दिले. (जिल्हा प्रतिनिधी)
राजवाडा जेलमुक्तीच्या दिशेने
गोंड राजाचा राजवाडा असलेल्या चंद्रपूर जिल्हा कारागृह आहे. एके काळी राजे राहणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूत आता गुन्हेगार सरकारी मुक्कामाला असतात. या ऐतिहासिक कारागृह परिसरातील पिंपळाच्या झाडाला १८५७ मध्ये वीर बाबूराव शेडमाके यांना ंिग्रज सरकारने फाशी दिली होती. त्यामुळे हा परिसर ऐतिहासिक बनला आहे. हे कारागृह ईतर ठिकाणी स्थंलातरित त करण्याचा प्रस्ताव या बैठकीत अधिकाऱ्यांपुढे ठेवण्यात आला. पिंपळाच्या झाडाला राष्ट्रीय स्मारक घोषित करण्याचा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे.
सव्वातीन एकरात पुरातन वास्तू संग्रहालय
जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा असलेल्या वस्तुंचे संग्रहालय करण्यासाठी आणि आदिवासी संस्कृतीच्या जतनासाठी सव्वातीन एकर जमीन जिल्हा प्रशासनाने दिली आहे. दुध डेअरीजवळ असलेल्या या जागेवर सध्या सुरक्षा भींतीचे काम झाले आहे. सहा कोटी रूपयांचे हे काम असून गरज पडल्यास सीएसआर फंडातूनही निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. येथे इंटरप्रिटीशन व कल्चरल सेंटर तयार करण्यासाठीचा मास्टर प्लॉन तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सराई मार्केटच्या मॉलमुक्तीचा प्रस्ताव
सराई मार्केट नावाने ओळखली जाणारी जटपुरा गेटवरील वास्तू दुर्लक्षितपणामुळे भंगारली आहे. या ठिकाणी मॉल उभारण्याचा महानगर पालिकेचा प्रस्ताव होता. मात्र ही ऐतिहासिक इमारत मॉलमुक्त करून या इमारतीचे पुनरूज्जीवन करण्याच्या विषयावर बैठकीत चर्चा झाली. या ऐतिहासिक इमारतीची देखभाल दुरुस्ती व जतन महापालिकेने करावे, असे सांगण्यात आले.
बिरशाहा समाधिस्थळ परिसरासाठी दीड कोटींचा प्रस्ताव
राजा बिरशाहा यांची समाधी असलेल्या अंचलेश्वर गेट परिसरातील समाधी परिसराच्या विकासासाठी दीड कोटी रूपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या ठिकाणाचे सौंदर्यीकरण करून बागेचा विकास आणि लायटिंग व साऊंड शो करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. अंचलेश्वर मंदीराच्या सुरक्षा भींतीसाठी ७५ लाख रूपयांचा निधी आला असून मंदीराची तटरक्षक भिंत उभारण्याचे कामही सुरू झाले आहे. मात्र झरपटच्या पुरामुळे या मंदीराला बाधा पोहचू नये यासाठी नदीलगत दुसरी भींत उभारून त्या ठिकाणी बाग व सौदर्यीकरण तसेच करण्याचा प्रस्तावही देण्यात आला आहे.
पराकोटाची दुरूस्ती
चंद्रपूर शहरातील प्राचीन परकोट देखभालीअभावी जागोजागी खचला आहे. अतिक्रमणही वाढले आहे. या पराकोटाच्या दुरूस्तीसाठी चार कोटी रूपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आलेल्या निधीतून बिनबा गेटजवळील खचलेल्या पराकोटाचे काम सुरू झाले आहे. पराकोटालगत अनेक ठिकाणी अतिक्रमणही वाढले आहे. या अतिक्रमणाची तत्कालिन नगर पालिकेने दखल न घेतल्याने समस्या बिकट झाली आहे. भद्रावती किल्ला, बल्लारशा किल्ला व गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडा मंदिराची देखभाल दुरुस्ती प्राधान्यांने करण्याच्याही सूचना देण्यात आल्या.