बल्लारपुरातील ऐतिहासिक किल्ल्याच्या महत्त्वात आता शिवजयंतीची भर !
By Admin | Updated: February 25, 2016 00:54 IST2016-02-25T00:54:19+5:302016-02-25T00:54:19+5:30
बल्लारपूरची ओळख आज औद्योगिक शहर अशी झाली आहे. सोबतच, या शहराला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.

बल्लारपुरातील ऐतिहासिक किल्ल्याच्या महत्त्वात आता शिवजयंतीची भर !
महत्त्व आणखी वाढले : स्वातंत्र्य व गणराज्य दिनाला होते ध्वजारोहण
वसंत खेडेकर - बल्लारपूर
बल्लारपूरची ओळख आज औद्योगिक शहर अशी झाली आहे. सोबतच, या शहराला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या भागात सुमारे ६०० वर्षे गोंडवंशीय राजांची सत्ता राहिली आहे. त्याकाळी बल्लारपूर (बल्लारशहा) अर्थात येथील वर्धा नदी काठावरील ऐतिहासिक किल्ल्याचे अनन्यसाधारण महत्व होते. आजही या किल्ल्याचे महत्त्व असून या ठिकाणी गणराज्य दिन, स्वातंत्र दिन, महाराष्ट्र दिन साजरा होतो. आता या ठिकाणी शिवजयंतीही साजरी करण्यास सुरूवात झाली आहे.
आदिया बल्लारसिंह या शासकाने हा किल्ला बांधून या भागाला बल्लारशहा असे नाव दिले. या ठिकाणी आदिया बल्लाळसिंह ते खांडक्या बल्लारशाह (कार्यकाळ १३२२ ते १४९७) असे सात राजे होऊ गेलेत. येथील शेवटचा राजा खांडक्या बल्लारशाह याला आताच्या चंद्रपूरच्या अंचलेश्वर मंदिराच्या जागेवर चमत्कारिक अनुभव आला आणि त्याने चंद्रपूरला परकोट बांधून बल्लारशहा येथील राजधानी चंद्रपूरला हलविण्याचे ठरविले.
त्याने परकोटाची पायाभरणी केली. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हिरशहा याने त्यावर परकोट बांधून चंद्रपूरला विकसित केले. यानंतर चंद्रपूरला महत्व आले ते कायमचे! बल्लारपूरच्या किल्ल्याचे गोंडकालीन साम्राज्यात असे महत्व होते. गोंड, भोसले ही राजेशाही गेली. नंतर इंग्रजांनी येऊन येथे आपली सत्ता गाजविली. हा किल्ला त्या घटनांचा साक्षीदार आहे. काळपरत्वे हा किल्ला काही ठिकाणी ढासळला असला तरी या किल्ल्याचे दोन मोठे प्रवेशद्वार, उत्तरेकडील लहान दरवाजा, नदीकडील तट आणि प्रवेशद्वार तसेच, नदी काठावरील हवेली राणी महल हे आजही मजबूत आणि चांगल्या स्थितीत आहेत. या किल्ल्याचे एकंदरीत ऐतिहासिक महत्व बघून या राष्ट्रीय वास्तू वैभवाचा सन्मान म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेने अर्थात बल्लारपूर नगर परिषदेने (न.प. पूर्वी नोटेफाईड एरिया) १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी गणतंत्र दिन, या राष्ट्रीय दिनी ध्वजारोहण करण्याची प्रथा सुरू केली. नगरपालिकेचे उपाध्यक्ष या ठिकाणी ध्वजारोहण करतात. याप्रसंगी लोकांची मोठी उपस्थिती असते. १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्य बनले. महाराष्ट्र दिनाप्रित्यर्थ किल्ल्यावर न.प. कडून उपाध्यक्ष यांचे हस्ते ध्वजारोहण करणे सुरू झाले. वर्षातून असे तिनदा ध्वजारोहण होत असते. शिवजयंती सर्वत्र साजरी केली जाते. बल्लारपूर शहरात त्याप्रसंगी मिरवणूक काढली जाते. साईबाबा मंदिरापासून ती काढली जात असे. गतवर्षीपासून स्थळात बदल करून ती आता ऐतिहासिक किल्ल्यापासून काढली जाऊ लागली आहे. शिवबाच्या अनुयायींनी येथील ऐतिहासिक किल्ल्याची शिवाजी महाराजांच्या जयंतीप्रसंगी घेतलेली ही दखल निश्चितच सुखावणारी आहे. आणि ऐतिहासिक किल्ल्यापासून मिरवणूक काढणे संयुक्तिकही ठरते. यंदा तर या मिरवणुकीचा बाज बघण्यासारखा होता. मराठमोळ्या पेहरावात महिला व पुरुषांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. किल्ल्याचे मोठे प्रवेशद्वार गर्दीने फुलले होते.