बाळापूर येथे इसमाचा संशयास्पद मृत्यू
By Admin | Updated: April 10, 2016 00:48 IST2016-04-10T00:48:41+5:302016-04-10T00:48:41+5:30
परिसरातील तळोधी वनपरिक्षेत्र बिट देवपायली कक्ष क्रमांक २७१ मध्ये बाळापूर-मिंडाळा रस्त्याच्या डाव्या बाजूला व बाळापूरला लागूनच असलेल्या अर्ध्या किमी अंतरावरील ....

बाळापूर येथे इसमाचा संशयास्पद मृत्यू
बाळापूर : परिसरातील तळोधी वनपरिक्षेत्र बिट देवपायली कक्ष क्रमांक २७१ मध्ये बाळापूर-मिंडाळा रस्त्याच्या डाव्या बाजूला व बाळापूरला लागूनच असलेल्या अर्ध्या किमी अंतरावरील झुडपी जंगलामध्ये शनिवारी एका इसमाचा संशयास्पद स्थिती मृतदेह आढळला.
गोकूल लक्ष्मण शेंडे (५५) रा. देवपायली असे या मृत इसमाचे नाव आहे. त्याची हत्या झाली, आत्महत्या की उष्माघाताने त्याचा मृत्यू झाला, याबाबत गूढ कायम आहे. आज सकाळी जंगलात मोहफूल वेचणाऱ्या व्यक्तींना एक इसम मृतावस्थेत आढळला. ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. बाळापूर, देवपायली, पारडी येथील लोकांचे जत्थे घटनास्थळाकडे रवाना झाले. त्यामधून सदर इसम हा देवपायली येथील गोकूल लक्ष्मण शेंडे असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या पत्नीच्या बयानावरून गोकूल शुक्रवारी सकाळी ८ वाजता घरून गेला होता. परंतु घरी परतला नाही. त्यांच्या मानेवर, कंबरेवर व पायावर काही जखमा दिसून येत आहे. त्याचा मृत्यू पाणी न मिळाल्याने उष्माघाताने झाला असावा, असा अंदाज पोलीस उपनिरीक्षक सोनवाने यांनी वर्तविला. शरीरावरील जखमासुद्धा उष्णतेचाच परिणाम आहे, असेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)