त्याईचे सरण, अमुचे जळण पाहिले म्या डोळा...
By Admin | Updated: December 2, 2014 23:02 IST2014-12-02T23:02:41+5:302014-12-02T23:02:41+5:30
कर्नाटक एम्टा कोळसा कंपनीद्वारे कोळसा धुळीच्या रुपाने सरण रचले जात आहे. आम्ही या सरणात जळतो आहो. आमच्या मरणाचा हा दुदैवी सोहळा दररोज आम्ही आमच्या डोळ्यानी पाहतो आहोत.

त्याईचे सरण, अमुचे जळण पाहिले म्या डोळा...
सचिन सरपटवार/ गणेश ठमके - कोंढा (भद्रावती)
कर्नाटक एम्टा कोळसा कंपनीद्वारे कोळसा धुळीच्या रुपाने सरण रचले जात आहे. आम्ही या सरणात जळतो आहो. आमच्या मरणाचा हा दुदैवी सोहळा दररोज आम्ही आमच्या डोळ्यानी पाहतो आहोत. हे भावनाविवश उद्गार आहे कोंढावासीयांचे. ज्यांनी कोळशाच्या धुळ प्रदूषणासमोर हात टेकले आहेत.
घराच्या टिनावर, स्लॅबवर कोळशाच्या धुळीचा थर, घरात भांड्यावर धुळ, खुंटीला लटकविलेल्या कपड्यांवर धुळ, झोपण्याच्या अंथरुन-पांघरुणावर धुळ, पिण्याच्या पाण्यात, अन्नात धुळ, देव घरावर धुळ या धुळीमुळे कोंढा येथील नागरीक त्रस्त आहेत. मजुरीला जावे की, आयुष्यभर घरातील धुळच पुसत राहावे? असा प्रश्न येथील महिला वर्ग विचारत आहेत.
कर्नाटका एम्टा कोळसा कंपनीच्या साईडिंग पर्यंतच्या कोळसा वाहतूकीमुळे धुळीचे प्रमाण इतके वाढले आहे की, त्याचा येथील नागरिकांच्या आरोग्यावर अत्यंत वाईट परिणाम होत आहे. त्वचेचे रोग, दमा, फुफ्फुसाचा तसेच विविध आजाराने ग्रामस्थ त्रस्त आहे. सततच्या कोळासा धुळीमुळे सकाच्यावेळी थुंकीतून चिकट काळे ठसे बाहेर पडत असल्याची धक्कादायक बाब ग्रामस्थानी सांगितली. या भयानक परिस्थितीला समोरे जाताना दररोज स्वत:चे मरण स्वत:च पाहत असल्याची भावना कोंढावासीयांच्या मनात निर्माण झाली आहे. प्रस्तुत प्रतिनिधींनी प्रत्यक्ष कोंढा गावाला भेट दिली असता, ग्रामस्थांनी आपबिती कथन केली. याप्रसंगी सरपंच प्रविण गोंडे, ज्ञानेश्वर मत्ते, बंडू बावणे, विजय विरुटकर, रामचंद्र शेडामे, महादेव काकडे उपस्थित होते.
रस्त्यावरील धुळीने गेला अनेकांचा जीव
कोंढा पाटी ते साईडिंग पर्यंतच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनिय झाली आहे. रस्त्यावर पाणी मारले जात नाही. नियमानुसार २० टनच्यावर कोळसा वाहतून करण्याची परवानगी नाही, असे उपविभागीय अभियंता सा.बां. उपविभाग भद्रावती यांचे लेखी पत्र आहे. परंतु, रस्त्यावरुन कोळशाची ओव्हरलोड वाहतूक होत आहे. ग्रामस्थानी आंदोलन केल्यानंतर देखाव्यासाठी पोलीस दोन ते चार वाहनांवर कारवाई करतात. वातावरण शांत झाले की पुन्हा येरे माझ्या मागल्या... अशी स्थिती होते. रस्त्यावर इतके खड्डे आहेत की खड्ड्यात अर्धाफूट धुळ साचते. पायी चालत गेल्यात पाय फसतात. याच रस्त्यावर येथील माजी पोलीस पाटील राघोबा वैद्य मरण पावले. बंडूजी बावणे यांची मुलगी शुभांगी अपघातात मरण पावली. याव्यतिरिक्त आठ ते दहा जणांचा या रस्त्यावर अपघातात मृत्यू झाला आहे.