वीरशहाचे स्मृतीस्थळ हिराई-वीरशहाच्या प्रेमाचे प्रतीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 06:00 IST2020-02-14T06:00:00+5:302020-02-14T06:00:42+5:30
बल्लारपूर व चंद्रपूर क्षेत्रात एकूण २३ गोंडवंशीय राजे होऊन गेलेत. त्यात राणी हिराई ही एकमात्र महिला शासक! राणी हिराईचे माहेर मध्यप्रदेशातील मदनापूरचे, तिचे वडील सरदार. त्यामुळे राजकारण आणि युद्ध कलेचे धडे बालपणापासूनच तिला मिळाले. वीरशहा गादीवर बसला. हिराईचा त्याच्याशी विवाह झाला. शूरवीर वीरशहाने आपली कारकीर्द गाजविली. त्याची हत्या झाली.

वीरशहाचे स्मृतीस्थळ हिराई-वीरशहाच्या प्रेमाचे प्रतीक
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : आज जागतिक प्रेम दिन! एकमेकांना प्रेमाच्या शुभेच्छा देण्याचा दिवस. प्रेम प्रतिक असणाऱ्या स्थळांना भेट देऊन, त्यांच्या प्रेमाची आठवण करण्याचा दिवस! चंद्रपूर येथील राजा वीरशहा यांचे स्मृति स्थळ हे राजा व त्याची राणी हिराई यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून महाविद्यालयीन तरूण व तरूणी या दिवशी तेथे जाऊन राजा तसेच राणी या दोघांच्या समाधींना गुलाबपुष्प वाहतात. या स्मृतीस्थळाला भेट देत असताना त्यांनी राजा व राणी यांच्या कर्तबगारीचीही माहिती ठेवावी! या ऐतिहासिक शासकांनी दीर्घकाळ स्मरणात राहावे असे कार्य केले आहे.
बल्लारपूर व चंद्रपूर क्षेत्रात एकूण २३ गोंडवंशीय राजे होऊन गेलेत. त्यात राणी हिराई ही एकमात्र महिला शासक! राणी हिराईचे माहेर मध्यप्रदेशातील मदनापूरचे, तिचे वडील सरदार. त्यामुळे राजकारण आणि युद्ध कलेचे धडे बालपणापासूनच तिला मिळाले. वीरशहा गादीवर बसला. हिराईचा त्याच्याशी विवाह झाला. शूरवीर वीरशहाने आपली कारकीर्द गाजविली. त्याची हत्या झाली. या दाम्पत्याला मूल नसल्याने विधवा हिराईने आपल्या नात्यातील सहा वर्षे वयाच्या मुलाला दत्तक घेउन त्याला गादीवर बसविले व ती राज्य कारभार बघू लागली. राणीने राज्याचे कुशलपणे नेतृत्व केले. लहानग्या रामशहाला संस्कारित केले. शत्रूंनी राज्यावर स्वारी केली. त्यांना तिने धाडसाने उत्तर दिले. राणी स्वत: रणांगणावर उतरली. प्रजेचे हित जोपासत उत्कृष्ट बांधकाम, शिक्षण याकडे लक्ष देउन राज्याचा सर्वांगीण विकास केला. राज्यावर औरंगजेबाचा अमल होता. तरीही राणीने राज्यात गोहत्या बंदी केली. अंचलेश्वर मंदिर तसेच महाकाली देवीचे भव्य व देखणे मंदिर बांधले. पती निधनानंतर राणी डगमगली नाही. पतीचे स्वप्न तिने खंबीरपणे उभे राहून पूर्ण केले. वीरशहा आणि हिराई या दाम्पत्यांनी उत्तम राज्यकर्ते म्हणून आपली कारकीर्द गाजविलीच.
आदर्श पती व पत्नी म्हणूनही त्यांनी आपले सांसारिक जीवन फुलविले. या कर्तबगार राजा व राणीच्या प्रेम प्रतिकांना भेट देताना, आपण चांगले कर्तव्यनिष्ट नागरिक व चांगले आदर्श पती व पत्नी बनू हा संकल्प तरूण - तरूणींनी करावा. आज देशाला त्याचीच नितांत गरज आहे.