जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात हिरकणी कक्षाची वाणवा
By Admin | Updated: September 29, 2014 00:42 IST2014-09-29T00:42:12+5:302014-09-29T00:42:12+5:30
राजकारण असो, समाजकारण तर शासकीय नोकऱ्यांमध्येही महिलांना आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्त होताना दिसत आहे.

जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात हिरकणी कक्षाची वाणवा
वरोरा : राजकारण असो, समाजकारण तर शासकीय नोकऱ्यांमध्येही महिलांना आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला कर्मचाऱ्यांची नियुक्त होताना दिसत आहे. पुरुष कर्मचाऱ्याप्रमाणे महिला कर्मचारीसुध्दा आपले कर्तव्य बजावत आहे. मात्र, महिला कर्मचाऱ्यांना आराम करण्यासाठी विश्रामगृह व ज्यांना लहान मूल आहे, त्यांच्याकरीता हिरकणी कक्षच नसल्याने महिला कर्मचाऱ्यांनी मोठी कुंचबना होत आहे.
पोलीस खात्यात नोकरी करणाऱ्या पुरुष व महिला कर्मचाऱ्यांना १२ तासापेक्षा अधिक वेळ उपस्थित राहून आपले कर्तव्य बजावावे लागते. कधी तर याही पेक्षा अधिक कालावधीत पोलीस ठाणे किंवा बंदोबस्ताच्या ठिकाणी तासन्तास उभे राहावे लागते. राज्यातील बहुतांश पोलीस ठाण्यात पुरुषांकरिता विश्राम गृहाची तसेच प्रसाधनगृहाची व्यवस्था केली आहे. महिला कर्मचाऱ्यांकरिताही प्रसाधनगृहाची व्यवस्था अनेक पोलीस ठाण्यांमध्ये आहे.
परंतु, महिला कर्मचाऱ्यांकरिता विश्रामगृहाची व्यवस्था अनेक पोलीस ठाण्यांमध्ये आजही करण्यात आलेली नाही. पोलीस ठाण्यात स्तनपान करण्याकरीता हिरकणी कक्ष नाही व महिलांकरिता आरामगृह नसल्याने महिला कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे पोलीस विभागाने लक्ष द्यावे. (तालुका प्रतिनिधी)