‘इस्पात’च्या कामगारांची वीरुगिरी
By Admin | Updated: June 11, 2015 01:29 IST2015-06-11T01:29:18+5:302015-06-11T01:29:18+5:30
गेल्या अनेक महिन्यापासून कामगार कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्या इस्पात कंपनी व्यवस्थापनाशी प्रशासनाच्या मध्यस्थीने तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत होते.

‘इस्पात’च्या कामगारांची वीरुगिरी
मागण्या प्रलंबित : व्यवस्थापन दखल घेईना
वरोरा : गेल्या अनेक महिन्यापासून कामगार कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्या इस्पात कंपनी व्यवस्थापनाशी प्रशासनाच्या मध्यस्थीने तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु यावर मार्ग निघू न शकल्याने अखेर कामगारांनी बुधवारी सकाळी ८.३० वाजता वरोरा तहसील परिसरातीलच टॉवर गाठून मनसेचे शहर अध्यक्ष मनिष जेठानी यांच्या समवेत टॉवरवर चढून तब्बल पाच तास वीरुगिरी केली.
तालुक्यातील बीएस इस्पात कंपनीतील कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या त्वरीत सोडविण्यात याव्या याकरिता मनसेचे वरोरा शहर अध्यक्ष मनीष जेठाणी यांच्या नेतृत्वात गेल्या अनेक दिवसांपासून कामगारांचे कामबंद आंदोलन सुरु आहे. यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना ४ जूनला कामगारांनी प्रलंबित मागण्यांचे निवेदन दिले होते. या भेटीदरम्यान पालकमंत्र्यांनी कंपनीच्या व्यवस्थापकाला मोबाईलद्वारे समस्या सोडविण्याचे आदेश दिले होते. तसेच ८ जूनला दुपारी ३ वाजता चंद्रपूर येथे कामगार आयुक्त समक्ष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र या बैठकीला कंपनीच्या व्यवस्थापन मंडळातील अधिकाऱ्यांनी अनुपस्थिती दाखविली. त्यामुळे वारंवार होणाऱ्या अवहेलनेबाबत संतप्त कामगारांनी वरोरा तहसील कार्यालय परिसरातील लोखंडी टॉवरवर चढून तब्बल चार तास वीरुगिरी केली. या दरम्यान वरोरा उपविभागीय अधिकारी ठाणेदार इंगळे यांनी कंपनी व्यवस्थापन व मनसे पदाधिकारी मनदीप रोडे, गांजरे यांच्याशी चर्चा करुन भोलानाथ चिकनकर, विकास किन्नाके, स्वप्नील मिलमिले यांना टॉवरवरुन खाली उतरविण्यात यश मिळविले.
या चर्चेत उपविभागीय अधिकारी जे. पी. लोंढे, ठाणेदार मलिकार्जुन इंगळे, मनविसे अध्यक्ष मनदीप रोठे, गांजरे, राजू बन्सोड, चेतन ढेंगळे, जयंत माशेरकर, महेश ठक, रिजवान रजा, विवेक बोकानी, निवृत्ती कांबळे आदी सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)