तिच्या जाण्याने हळहळले समाजमन
By Admin | Updated: April 27, 2016 00:45 IST2016-04-27T00:45:52+5:302016-04-27T00:45:52+5:30
खडसंगी येथील बसस्थानक परिसरात मागील दोन वर्षांपासून दुकानातील रिक्त जागेत आपले वास्तव्य करुन जनतेने दिलेल्या अन्नावर...

तिच्या जाण्याने हळहळले समाजमन
अत्याचार करून खून केल्याचा संशय
खडसंगी : खडसंगी येथील बसस्थानक परिसरात मागील दोन वर्षांपासून दुकानातील रिक्त जागेत आपले वास्तव्य करुन जनतेने दिलेल्या अन्नावर आपली भूक भागविणारी तेलगू भाषिक ६० वर्षीय माधुरीच्या अचानक जाण्याने खडसंगीसह परिसरातील समाजमन हळहळले.
खडसंगी येथील बसस्थानक परिसरात मागील दोन वर्षांपासून एक वेडसर महिला वास्तव्य करीत होती. खडसंगी येथील बाजार लाईन परिसरातही ती दिसायची. तिला कुठलाही आधार नसल्याने दुकानदार तथा हॉटेलमालकांनी दिलेल्या अन्नावर व चहावर ती आपली भूक भागवायची. वेडसर असली तरी ती रोज नित्याने सकाळी नळावर जाऊन आंघोळ करुन कपडेसुद्धा तिथेच धुवायची. तिच्या या कार्याने तिला स्वच्छता आवडत असावी, असे वाटायचे. या तिच्या कार्याने खडसंगी परिसरात ती सर्वांची आवडती झाली होती.
मात्र अशातच वेडसर माधुरीच्या जीवनात सोमवारची सकाळ काळ ठरली. रोजच्या नित्याप्रमाणे ती समर्थ स्टिल दुकानात झोपली असता तिच्यावर अत्याचार करुन खून केल्याचा संशय परिस्थितिजन्य पुराव्यावरुन व नागरिकांंकडून वर्तविल्या जात आहे.
वेडसर माधुरीवर अत्याचार करुन खून केल्याची वार्ता गावात पसरताच अख्खे गाव तिला पाहण्यासाठी घटनास्थळावर दाखल झाले. यावेळी अनेक महिलाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
नागरिकांनी या घटनेचा निषेध करीत निराधार वेडसर महिलेवर अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करुन आरोपींना शोधून काढण्याची मागणी केली. मात्र या माधुरीच्या अचानक जाण्याने खडसंगी परिसरातील समाजमन हळहळले.
पोलीस म्हणतात
अत्याचार झाला नाही
चिमूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेहाची उत्तरीय तपासणी केली असता उत्तरीय तपासणी अहवालानुसार ती भुकेने अशक्त होवून मरण पावल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिल्याचे सांगण्यात आले आहे.
रक्ताचे डाग आले कुठून?
वेडसर माधुरी जिथे झोपली होती तिथे रक्ताचे डाग आले कसे ? तिचे कपडे अस्ताव्यस्त कसे झाले व ती नग्न अवस्थेत कशी ? हे सर्व प्रश्न अजूनही अनुत्तरीय आहेत. तिच्यावर अत्याचार झाल्याचा संशय जास्त बळावला आहे. या सर्व प्रकाराचा खुलासा करणे चिमूर पोलिसांपुढे आव्हान आहे. (वार्ताहर)