आहार शिजविण्याचे मदतनिसांचे मानधन थकविले
By Admin | Updated: April 15, 2016 01:26 IST2016-04-15T01:26:10+5:302016-04-15T01:26:10+5:30
तालुक्यातील करंजी येथील पाच अंगणवाड्यांना गावातीलच जागृती महिला बचत गटाकडून आहार पुरवठा करण्यात येतो.

आहार शिजविण्याचे मदतनिसांचे मानधन थकविले
गोंडपिंपरी : तालुक्यातील करंजी येथील पाच अंगणवाड्यांना गावातीलच जागृती महिला बचत गटाकडून आहार पुरवठा करण्यात येतो. आहार पुरवठा करीत असताना सदर आहार गटामार्फेत शिजवून देणे गरजेचे आहे. मात्र तंटामुक्त विशेष शांतता पुरस्कारप्राप्त करंजी गावात जागृती महिला बचत गटाकडून आहार शिजवून देणे तर सोडाच, आहार शिजविणाऱ्या मदतनिसांना मानधनदेखील गेली सात- आठ वर्षांपासून देण्यात आले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यातच शासनाच्या निकषानुसारसुद्धा आहार पुरवठा होत नसल्याची ओरड होत आहे.
करंजी गाव हे या ना त्या कारणांनी नेहमी चर्चेत राहते. ४५०० लोकसंख्या असलेल्या करंजी गावात पाच अंगणवाड्या आहेत. त्यात जवळपास दीडशे विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. सुदृढ आरोग्य, नियमित शाळेत जाण्याची सवय लागावी, पूर्व प्राथमिक शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शासनाने अंगणवाड्या सुरू केल्या. त्यातच लहानपणापासून सकस आहाराची सवय लागावी, हासुद्धा हेतू असतो. यासाठी अंगणवाडीतील बालकांना महिला व बालकल्याण प्रकल्प कार्यालयाकडून आहार पुरवठा केला जातो. यासाठी करंजी गावात जागृती महिला बचत गट कार्यरत असून त्याच गटाकडून गावात असलेल्या पाचही अंगणवाड्यांना आहार पुरवठा करण्यात येतो. मात्र सदर बचत गटाकडून आहार पुरवठा करताना शासनाच्या निकषाला पूर्णपणे बगल दिली जात आहे. आहार शिजवून अंगणवाडीला देणे गरजेचे असताना केवळ धान्याचा पुरवठाच सदर महिला बचत गटाकडून करण्यात येत आहे. त्यातही निमुटपणे आहार शिजवून अतिशय तोकड्या मानधनावर काम करणाऱ्या मदतनिसांचे आहार शिजविण्याचे पैसेदेखील दिले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
तंटामुक्तीचा विशेष पुरस्कारप्राप्त गावात ही गंभीर बाब घडणे ही लाजीरवाणी बाब आहे. दरम्यान, सदर महिला बचत गट बदलवून देण्यात यावा, अशी तक्रार अंगणवाडीच्या शिक्षिका व मदतनिसांच्या स्वाक्षऱ्यानिशी ग्रामपंचायत आणि महिला व बालकल्याण प्रकल्प कार्यालयाकडे करण्यात आलेली आहे.
आजपर्यंत थकविण्यात आलेले मदतनिसांचे आहार शिजविण्याचे मानधन देण्यात यावे, सदर जागृती बचतगट बदलविण्यात यावे आणि शासनाच्या निकषानुसार आहार पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आहे. सदर महिला बचत गट हे माजी सरपंच राहिलेल्या तसेच अंगणवाडी शिक्षिका राहून आणि हल्ली महिला व बालकल्याण प्रकल्प कार्यालयाअंतर्गत असलेल्या एका कर्मचाऱ्यांच्या मुलीचे असल्याचे समजते. (शहर प्रतिनिधी)