महामारीच्या काळात भरभरून मदत करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:28 IST2021-04-24T04:28:18+5:302021-04-24T04:28:18+5:30
भद्रावती : कोरोना प्रादुर्भावाच्या बाबतीत भद्रावती तालुक्याची हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. गुरुवारी तर तालुक्यात सर्वाधिक १४९ पॉझिटिव्ह ...

महामारीच्या काळात भरभरून मदत करा
भद्रावती : कोरोना प्रादुर्भावाच्या बाबतीत भद्रावती तालुक्याची हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. गुरुवारी तर तालुक्यात सर्वाधिक १४९ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. मृतकांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांची परवड होत असून, कुठे बेड मिळत नसल्याच्याही घटना घडत आहे. तालुक्याचे आरोग्य अधिक बिघडू नये व त्यावर आताच नियंत्रण आणावे, यासाठी संकट काळात मदतीचे हात समोर येणे आवश्यक आहे. महामारीच्या या काळात फक्त शासन-प्रशासन यावर अवलंबून न राहता, या सेवाकार्यात नागरिकांनी, सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात हातभार लावावा, असे आवाहन नगरपरिषद भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी केले आहे.
समोर येणाऱ्या भयावह परिस्थितीचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणेला आवश्यक असलेल्या ऑक्सिजन सिलिंडर, फ्लो मीटर, जंबो सिलिंडर, लहान सिलिंडर, स्प्रे पंप, हातमोजे, बेड, पीपीई किट यासह विविध साहित्यासाठी नागरिकांनी व सामाजिक संघटनांनी मदतीसाठी समोर येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फक्त भद्रावती तालुक्यातच नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यात अशा प्रकारच्या सहकार्याची आवश्यकता आहे. ज्या समाजात आज आपण राहतो, त्या समाजाला संकट काळात मदत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे आणि या कार्यात तर फक्त ‘खारुताईचा’ नाही तर ‘सिंहाचा’ वाटा असणे आवश्यक आहे.
मागील वर्षी कोरोना काळात अनेक सामाजिक संस्थांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना दोन वेळच्या जेवणाची, तसेच किराणा सामानाची मदत केल्याचे वास्तव आहे.
सामाजिक बांधिलकीतून येथील डॉ.विवेक शिंदे यांनी कोरोना काळात कोणताही आजार असणाऱ्या रुग्णांसाठी हेल्पलाइन सुरू केली आहे. या रुग्णांना विनामूल्य आरोग्यविषयक सल्ला देण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांना घरबसल्या उपचार, तसेच नातेवाइकांचा त्रासही कमी होणार आहे. संबंधितांनी या हेल्पलाइनचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ.विवेक शिंदे यांनी केले आहे.