संपूर्ण दारूबंदीसाठी पोलीस घेणार लोकप्रतिनिधींची मदत
By Admin | Updated: June 5, 2015 01:15 IST2015-06-05T01:15:46+5:302015-06-05T01:15:46+5:30
चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी लागू झाली. दारूच्या दुकानांना कुलूप लागले. बिअरबारही बंद झाले आहेत. तरीही, लगतच्या जिल्ह्यांमधून दारू आणून येथे विकली जात आहे.

संपूर्ण दारूबंदीसाठी पोलीस घेणार लोकप्रतिनिधींची मदत
बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिलपासून दारूबंदी लागू झाली. दारूच्या दुकानांना कुलूप लागले. बिअरबारही बंद झाले आहेत. तरीही, लगतच्या जिल्ह्यांमधून दारू आणून येथे विकली जात आहे. आधी ज्या दारूची किंमत २० रुपये होती ती आता १०० रुपयाने विकली जात आहे. यामुळे, दारूबाज लुबाडले जात आहे व दारूबंदीचा फज्जा उडत आहे. हा प्रकार पूर्णत: बंद व्हावा, याकरिता बल्लारपूर पोलिसांनी पुढाकार घेऊन संपूर्ण दारूबंदीकरिता लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचे सहकार्य घेण्याकरिता पाऊल उचलले आहे. याची सुरुवात येथील नगरसेवकांची सभा घेऊन करण्यात आली.
नगर परिषद सभागृहात पालिकेचे उपाध्यक्ष संपत कोरडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत पोलीस निरीक्षक नरूमणी टांडी, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, भाजपाचे वरिष्ठ नेते व नगरसेवक चंदनसिंह चंदेल, शिवसेनेचे नेते व न.प. चे माजी उपाध्यक्ष सिक्की यादव, सहायक पोलीस निरीक्षक राठोड, कोंडावार, गंद्येवार, न.प.चे कार्यालय अधिक्षक विजय जांभुळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दारूबंदीनंतरही बल्लारपुरात लपून छपून दारूविक्री होत आहे. त्यावर संपूर्ण बंदी करणे आवश्यक असून त्याकरिता लोकांचे सहकार्य गरजेचे आहे. यावर उपाययोजना म्हणून वॉर्डा-वॉर्डामध्ये समिती स्थापन करून ही समिती याबाबत पोलिसांना सहकार्य करेल. कुणी दारू विकत असल्याचे वा दारू पिऊन असल्याचे आढळल्यास तसे पोलिसांना समिती सदस्य कळवतील. महिला बचत गटानेही याकामी सहकार्य घेतले जाईल असे टांडी यांनी प्रास्ताविकातून सांगितले. यावर घनशाम मुलचंदानी, शांता बहुरिया, चंदनसिंह चंदेल, काँग्रेसचे गटनेता देवेंद्र आर्य, सिक्की याादव, गौरकार, विक्की दुपारे, संपत कोरडे यांनी काही सूचना मांडल्या. रेल्वेने आंध्रप्रदेशातून दारू कशी आणली जाते, कुठे उतरविली जाते. त्याकरिता काय उपाययोजना केली पाहिजे. या व्यवसायात तरुण मुलं उतरले असून त्यांना कसे रोखता येईल, यावर यात चर्चा करण्यात आली. अवैध दारू विक्रीत काही पोलिसांचाही सहभाग असल्याचा सूर सभेत उमटला त्यावर, तसे आढळल्यास अशा पोलिसांवर निश्चित कारवाई केली जाईल, असे आश्वासन टांडी यांनी सभागृहाला दिले. दारूबाबत कुणालाही पकडल्यास तो आपला माणूस आहे, त्याला सोडून द्या अशी शिफारस घेऊन कुणी येऊ नये असे टांडी यांनी सुचविले. संपूर्ण दारूबंदीकरिता, सर्वत्र पाळत ठेवण्याकरिता पोलिसांची एक टीमच तयार करण्यात आली आहे. या सभेत नगरसेवकांसह विजय मुके, निवलकर, सुभाष शिडाम, प्रतीश रायपुरे आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)