चंद्रपूर : मागील काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे राज्य सरकारने सचारबंदी लागू केली आहे. आता घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. त्याचा फटका सर्वांनाच बसत असला तरी वृद्धाश्रमामध्ये असलेल्या निराधारांना मागील वर्षभरापासून मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नियमित येणाऱ्यांचीही संख्या रोडावली आहे. परिणामी त्यांना एकाकी जीवन जगावे लागत आहे.
चंद्रपूर शहरात सद्यस्थितीत दोन वृद्धाश्रम आहेत. यातील भिवकुंड परिसरात मातोश्री वृद्धाश्रम तसेच देवाडा येथे डेबू वृद्धाश्रम आहे. या दोन्ही वृद्धाश्रमांमध्ये २५ महिला तसेच २५ पुरुष वास्तव्याला आहेत. दोन्ही वृद्धाश्रमांमध्ये संस्थेद्वारे त्यांचे पालनपोषण केले जाते. मात्र, अन्यवेळी समाजातील दानशूर व्यक्तींची मदत मिळत होती. आता कोरोना संकटामुळे बहुतांश समाजसेवी संस्थांची मदत आटली आहे. त्यातच वाढदिवस, विविध महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी तसेच इतरही कार्यक्रम घेतले जायचे. मात्र, कोरोना संकटामुळे यावरही प्रतिबंध आल्यामुळे सद्यस्थितीत वृद्धाश्रमात कुणीही फिरकत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे येथील वृद्धांना एकाकी जीवन जगावे लागत आहे. विशेष म्हणजे उपस्थित असलेल्या आपल्या बांधवांमध्येच ते एकमेकांकडे विचारविमर्श करीत एक एक दिवस कंठीत आहेत.
बाॅक्स
भेट देणारे शुन्यावर
मागील वर्षभरापासून कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे या वर्षभरात वृद्धाश्रमाला भेट देणाऱ्यांची संख्या बरीच कमी झाली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर काही प्रमाणात भेट देणारे नियमित येऊ लागले होते. मात्र, आता पुन्हा कोरोनाने तोंड वर काढल्यामुळे येणाऱ्यांची संख्या पूर्णत: बंद झाली आहे.
बाॅक्स
मदतही आटली
वर्षभरापूर्वी विविध सामाजिक संस्था, संघटना तसेच समाजातील दानशूर व्यक्ती मोठ्या प्रमाणात विविध स्वरुपात मदत करत होते. मात्र, कोरोना संकटापासून मदतीचा ओघ आता थांबला आहे. त्यामुळे संस्थेतील पदाधिकारीच वृद्धाश्रम चालवित असून, त्यांनाही मोठी कसरत करावी लागत आहे.
बाॅक्स
कार्यक्रम पूर्णत: बंद
कोरोनापूर्वी बहुतांश नागरिक वृद्धाश्रमामध्ये असलेल्या आजी - आजोबांसोबत सोहळे साजरे करीत होते. यामुळे आनंद वाटत होता. मात्र, आता कार्यक्रम पूर्णत: बंद झाल्यामुळे वृद्धाश्रमात करमत नसल्याची खंत येथील वृद्धांनी व्यक्त केली.
बाॅक्स
संसर्गाची भीती
कोरोना संकटामुळे आता लाॅकडाऊन करण्यात आले. संकट सातत्याने वाढत असल्याने संसर्गाची भीती आहे. वृद्धाश्रमात हा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे प्रत्येक वृद्धाला सांभाळून ठेवणे सद्यस्थितीत कठीण काम झाले आहे. त्यामुळे बाहेरील व्यक्तिंना प्रवेश बंद करण्यात आला आहे.
बाॅक्स
प्रत्येकाचीच अडचण
कोरोनामुळे प्रत्येक जण अडचणीत आला आहे. अनेकांचे अर्थचक्र थांबले आहे. त्यामुळे काहींची इच्छा असूनही ते मदत देऊ शकत नाहीत, तर काही संसर्गाच्या भीतीमुळे वृद्धाश्रमात जाणे टाळत आहेत. परिणामी मदतीचा ओघ आता पूर्णपणे थांबल्यासारखाच आहे.
बाॅक्स
वृद्धाश्रमातील एकूण सदस्य ५०, स्त्री २५,
पुरुष २५