चंद्रपूर : बदललेली दिनचर्या, व्यायामाकडे दुर्लक्ष, वाढते वजन आणि उंच टाचांची चप्पल या व अशा कारणांमुळे टाचदुखीचे रुग्ण वाढत आहेत. आता तर अगदी कमी वयापासूनच टाचदुखीच्या समस्येने रुग्ण त्रस्त आहेत. काही जण याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, हे दुर्लक्ष कधीकधी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे टाचदुखी असेल तर जीवनशैली बदलून त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. टाचदुखीकडे वेळीच लक्ष द्या.
तळपायाचे आजार कोणते ?तळपायांना अनेक आजार होऊ शकतात, जसे की प्लांटार फेसिआइटिस (टाचा दुखणे), मॉर्टन न्यूरोमा (पायाच्या बोटांमध्ये वेदना), प्लांटार मस्से (विषाणूमुळे होणारा त्वचेचा त्रास) आणि इतर अनेक समस्या.
कारणे काय ?
- अतिवजन : व्यक्तीचे वजन वाढल्यास शरीरावर भार येतो. त्यामुळे टाचदुखीचा त्रास वाढतो.
- हाड वाढल्यावर : टाचेच्या आतले हाड अनेकवेळा वाढते. त्यामुळे देखील टाचदुखीचा त्रास होत असतो.
- नेहमी उभे राहण्याचे काम : दीर्घकाळ उभे राहणे किंवा कठीण पृष्ठभागावर चालण्यामुळेही दुखणे वाढते.
काय काळजी घ्याल?
- हे टाळा : शक्यतो जास्त वेळ उभे राहणे टाळावे, त्रास वाढल्यास जॉगिंग, धावणे टाळावे, युरिक अॅसिड वाढल्यामुळे हा त्रास होतो. त्यामुळे युरिक अॅसिड वाढेल असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. अपुरा आधार किवा चुकीचे फिट असलेले बूट, उंच टाचेच्या चपला वापरल्यानेही टाचदुखी होऊ शकते. अशा वेळी तळव्याच्या रचनेनुसार चप्पल-बूट वापरले पाहिजेत. बुटांमधे हिल कप्स किंवा स्कूप्ड हिल्सचा वापर करावा, यामुळेही हा त्रास कमी होऊ शकतो.
- हे कराः नियमित योगासने केली पाहिजेत. भिंतीला हात टेकवून पायाच्या बोटांवर उभे राहावे आणि टाचा वर उचलाव्यात. या अशा स्थितीमध्ये जागच्या जागी जॉगिंग करायचा प्रयत्न करावा. तळव्याखाली छोटा बॉल घेऊन तो रोल करीत राहावे, यामुळे त्रास कमी होईल. नियमित व्यायाम करणेही गरजेचे आहे.
"टाचदुखीचे मुख्य कारण शरीराचे वाढलेले वजन असू शकते. त्यामुळे वजन नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. सोबतच नियमित व्यायाम, योगासन करावे, अधिक वेळ उभे राहून नियमित काम करायचे असेल तर दर काही वेळाने पायांना आराम द्यावा. घरामध्ये विशेषतः स्टाइलवरून चालताना पायामध्ये मऊ चप्पल, स्लीपलचा वापर करावा."- डॉ. विनोद मुसळे, अस्थिरोगतज्ज्ञ, चंद्रपूर