वनविकास महामंडळात प्रचंड गैरप्रकार

By Admin | Updated: July 5, 2017 01:06 IST2017-07-05T01:06:00+5:302017-07-05T01:06:00+5:30

मध्य चांदा वनप्रकल्प विभाग बल्लारशाह अंतर्गत कन्हारगाव, झरण, तोहोगाव व धाबा वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असून ...

Heavy malpractices in the forest development corporation | वनविकास महामंडळात प्रचंड गैरप्रकार

वनविकास महामंडळात प्रचंड गैरप्रकार

अधिकाऱ्यांचे संगणमत : कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई, अधिकारी मोकाट
लोकमत न्यूज नेटवर्क
कोठारी : मध्य चांदा वनप्रकल्प विभाग बल्लारशाह अंतर्गत कन्हारगाव, झरण, तोहोगाव व धाबा वनपरिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असून आतापर्यंत सात वनरक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र वरिष्ठांच्या मर्जीने झालेल्या गैरप्रकारात अधिकारी मात्र मोकाट असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.
मागील वर्षीच्या हंगामात कक्ष क्रं. १६ मध्ये बांबु निष्कासनाचे काम करण्यात आले. निष्कासनाचा बांबु व बांबु बंडल विक्री डेपोवर वाहतूक होणे आवश्यक असताना वर्षभरापासून वाहतूक करण्यात आली नाही. त्यामुळे बांबुचा दर्जा घसरला असून बांबुची विक्री किंमत घटली आहे. त्यामुळे महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार एप्रिल महिन्यात उघडकीस आला. त्यावर संबंधित वनरक्षक प्रशांत मलांडे यांना निलंबीत करण्यात आले आहे. मात्र या प्रकारात गुंतलेल्या जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई का करण्यात आली नाही.
तसेच कामाचे निरीक्षण व मार्गदर्शन करणाऱ्या व सदर कामाचे देयके मंजुर करणाऱ्या सहा व्यवस्थापकांना कारवाईपासून अलिप्त ठेवण्यात आले आहे.
सन २०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या हंगामात कक्ष क्रं. ६९ मध्ये ५० हेक्टरचे रोपवन करण्याचे उद्दिष्ट होते. त्यासाठी उभ्या जंगलाची कत्तल करून रोपवन क्षेत्र तयार करण्यात आले. या कामावर महामंडळाने लाखो रुपये खर्च केले.
मात्र सहायक व्यवस्थापक सुनील पाटील यांनी या क्षेत्राची पाहणी केली असता, दहा हेक्टर क्षेत्र कमी भरले व जिवंत साग रोपाची टक्केवारी ९ टक्के असल्याचा अहवाल सादर केला. याबाबत संबंधित वनरक्षकांना जबाबदार धरून कारवाईचा बडगा उगारल्याचे समजते.
वास्तविक, रोपवनाचे क्षेत्र निश्चित करून करावयाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार केल्यानंतर वरिष्ठ अधिकारी मंजुरी देतात. त्यानंतर सीमांकन करणे, झाडांची संख्या मोजणे ही कामे केली जातात. सीमांकन केल्यानंतर निश्चित क्षेत्र योग्य व नकाशाप्रमाणे असल्याची पाहणी वनाधिकारी व सहायक व्यवस्थापक करून त्याची देयकास प्राथमिक मंजुरी देण्यात येते. सहायक व्यवस्थापकाने प्रत्यक्षात क्षेत्राची योग्य तपासणी केली असती तर क्षेत्र कमी झाले नसते. मात्र वरिष्ठ अधिकारी मोका तपासणी न करता कार्यालयात बसूनच मंजुरी दिल्याने महामंडळाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या प्रकारात वनरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी व संबंधित सहायक व्यवस्थापक दोषी असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे.
वनविकास महामंडळात अशाप्रकारचे गैरप्रकार वरिष्ठांच्या मर्जीने होत असल्याचा आरोप होत आहे. मात्र चौकशीचा फार्स पुढे करून कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याच्चेही बोलले जात आहे.
आजपर्यंत वनविकास महामंडळात वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याचे एकही प्रकरण नाही. वनविकास महामंडळात दरवर्षी विविध कामासाठी करोडो रुपयांची उलाढाल होत असते. त्यात तुटपुंज्या वेतनावर कनिष्ठ कर्मचारी दिवसंरात्र मेहनत करून दिलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यात त्यांना मजुरांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

कक्ष क्रं. १६ मधील बांबु बंडल व लांब बांबू निष्कासन झाल्यानंतर त्याची वेळेवर वाहतूक न केल्याने पत घसरली आहे. बांबु जंगलात अस्ताव्यस्त विखुरलेला असल्याने महामंडळाचे मोठे नुकसान झाल्याने प्रशांत मलांडे व वनरक्षकास निलंबीत करण्यात आले आहे. त्याच्याकडून नुकसान भरपाई वसुल केली जाणार आहे.
- सुनील गोरे,
वनपरिक्षेत्र अधिकारी, कन्हारगाव.

Web Title: Heavy malpractices in the forest development corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.