‘सुकन्या समृद्धीला’ नेटवर्कचा ताप
By Admin | Updated: February 25, 2015 01:23 IST2015-02-25T01:23:57+5:302015-02-25T01:23:57+5:30
स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व कामे आॅनलाईन करण्यात आली आहेत.

‘सुकन्या समृद्धीला’ नेटवर्कचा ताप
चंद्रपूर : स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व कामे आॅनलाईन करण्यात आली आहेत. मात्र, इंटरनेट सुविधेत वारंवार येत असलेला बिघाड हा कर्मचारी व लाभार्थ्यांसाठी डोकेदुखीचा विषय ठरत आहे. असाच प्रकार डाक विभागाच्या सुकन्या समृद्ध योजनेचे खाते उघडण्यासाठी दिसून येत आहे.
डाक विभागाकडून २ डिसेंबर २०१४ पासून ‘सुकन्या समृद्धी खाते’ ही योजना सुरू करण्यात आली. योजनेचे खाते उघडण्यासाठी पंधरवड्यापासून डाक कार्यालयात गर्दी होत आहे. मात्र, खाते उघडण्यात ‘नेट’ची तांत्रिक अडचण येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. परिणामी, कामे संथगतिने होत असल्याने मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केला. २२ जानेवारीला या योजनेची सुरूवात झाली आहे. मुलींना कमी लेखल्या जाऊ नये, तिचे ओझे वाटू नये, मुलीला समाजात मानाचे स्थान मिळावे हा उद्देश सुकन्या योजनेतून डाक विभागाने समोर ठेवला. भविष्यात पालकांना मुलीच्या लग्नासाठी सावकारांकडून कर्ज घेण्याची गरज पडणार नाही, सोबतच ‘बेटी बचाव’ अभियानाला हातभार लागेल, असे बहुविध फायदे या योजनेचे आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांनी या योजनेसाठी डाक कार्यालयात एकच गर्दी केली आहे. त्यामुळे दुर्लक्षीत डाक विभाग अचानक चर्चेत आला. मात्र, कायम विस्कळीत सेवा देण्यात सराईत असलेल्या ‘बीएसएनएल’मुळे खाते उघडण्याला खोडा बसला आहे. शनिवारी नेटवर्क समस्या उद्भवल्याने खाते उघडण्याचे काम ठप्प झाले. खाते आॅनलाईन उघडायचे असून दुसरीकडे नवीन सॉफ्टवेअर असल्याने डाक कर्मचाऱ्यांना हाताळणीची सवय नाही. प्रशिक्षित कर्मचारीही नाहीत. त्यामुळे एकाच अर्ज भरण्यास बराच वेळ लागत आहे. अशा अनेक समस्यांमुळे ग्राहकांना कासवगतीने सेवा मिळत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
योजनेचे नियम
सदर खात्यासाठी पालक ठेवीदार तर मुलगी खातेधारक राहणार आहे.
मुलीच्या जन्मापासून ते वयाच्या १० वर्षांपर्यंत खाते उघडता येते.
पालकाची केवायसी कागदपत्रे, मुलीच्या जन्माचा दाखला आदी कागदपत्रे आवश्यक.
वयाच्या १४ वर्षांपर्यंत रक्कम भरावयाची आहे.
वर्षात किमान १ हजार रुपये जमा झाले नाही, तर खाते बंद पडेल.
मुलीचा जन्म २ डिसेंबर २००३ रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा.